IND vs AUS : अहमदाबाद कसोटीत ९ धावा केल्यानंतर पुजारा करू शकतो सचिन-द्रविडच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री | पुढारी

IND vs AUS : अहमदाबाद कसोटीत ९ धावा केल्यानंतर पुजारा करू शकतो सचिन-द्रविडच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. अंतिम सामना जिंकून मालिका ३-१ अशी जिंकण्याकडे भारताचे लक्ष्य आहे. भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा या सामन्यात विशेष कामगिरी करू शकतो. तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे. या मालिकेत पुजाराने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. त्याने तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावात अनुक्रमे ७, ०, नाबाद ३१, १ आणि ५९ धावा केल्या आहेत. पुजाराने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४२ डावात १९९१ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५१.०५ आहे. पुजाराने ५ शतके आणि ११ अर्धशतके केली आहेत. अहमदाबाद कसोटीत त्याने आणखी नऊ धावा केल्या तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा पूर्ण करेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा करणारा सचिन पहिल्या क्रमांकावर

पुजाराने दोन हजार धावा पूर्ण केल्यास तो सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या क्लबमध्ये सामील होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून फक्त द्रविड, लक्ष्मण आणि तेंडुलकर यांनी २ हजार हून अधिक धावा केल्या आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत सचिन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ३९ कसोटीत ५५ च्या सरासरीने ३६३० धावा केल्या आहेत. तसेच कांगारू संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २९ कसोटीत ५४.३६ च्या सरासरीने २५५५ धावा केल्या आहेत.

शेवटच्या कसोटीत भारताला विजय आवश्यक

या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी जिंकली होती. त्यानंतर दिल्ली कसोटी सहा गडी राखून जिंकली. तर ऑस्ट्रेलियन संघाने इंदूरला तिसरी कसोटी नऊ गडी राखून जिंकून मालिकेत पुनरागमन केले. चौथी कसोटी जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भरताला ही कसोटी जिंकावी लागणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button