

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) सुरू असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे, टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याला धावा करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. कोहलीच्या बॅटमधून धावा होत नाही, त्यामुळे संघाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरली आहे. कोहलीला मागील १५ डावांत एकही शतकी खेळी करता आलेली नाही. अर्धशतकही धावफलकावर लावता आलेले नाही. दरम्यान, कोहलीच्या खराब कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉर्डर-गावसकर मालिका सुरू होण्याआधी विराट कोहली या मालिकेत (IND vs AUS) शतकांचा दुष्काळ संपवेल, असा अंदाज अनेक जाणकारांनी वर्तवला होता. मात्र, कोहलीच्या आतापर्यंतच्या कामगिरीने सर्वांचेच अंदाज चुकविले आहेत. कोहलीच्या शॉट सिलेक्शनवर सर्वजण बोट ठेवत आहेत. तर, दुसरीकडे रिकी पाँटिंगने वेगळे मत व्यक्त केले आहे. कोहली शतक झळकावण्यात अपयशी ठरत असल्याते खराब फॉर्म हे मुख्य कारण नाही, असे पाँटिंगने म्हटले आहे.
रिकी पाँटिंगने म्हटले आहे की, पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच खराब होती. त्यामुळे सर्वच फलंदाजांना धावा करण्यासाठी झगडावे लागले. त्यामुळे या मालिकेत फलंदाजी करणे किती कठीण होते, हे आपल्या लक्षात येते. हे केवळ टर्निंग विकेटमुळे नाही, तर चेंडूच्या असमान उसळीमुळे फलंदाजी करण्यास अडथळे येत होते. कोहली चॅम्पियन खेळाडू आहे आणि असे खेळाडू स्वतःचा मार्ग तयार करत असतात. तो सध्या धावा करू शकत नाही, पण त्याला स्वतःला हे माहीत आहे. कारण एक फलंदाज म्हणून तुम्हाला काय केले पाहिजे. त्यामुळे कोहलीच्या खराब कामगिरीची मला काळजी करण्यासारखे काही वाटत नाही. कारण तो पुनरागमन करण्याचा मला विश्वास आहे, असे पाँटिंग म्हणाला.
मी या मालिकेतील कोणाच्याही फॉर्मबद्दल जास्त विचार करत नाही. कारण ही मालिका एक फलंदाज म्हणून दुःस्वप्न ठरली आहे. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना जिंकून शानदार पुनरागमन केले आहे, असेही पाँटिंगने सांगितले.
हेही वाचा