Beth Mooney : बेथ मुनी गुजरात जायंट्सची कर्णधार, स्नेह राणाकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी | पुढारी

Beth Mooney : बेथ मुनी गुजरात जायंट्सची कर्णधार, स्नेह राणाकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात जायंट्सने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज बेथ मुनीची (Beth Mooney) संघाची कर्णधार म्हणून निवड केली आहे. तिने रविवारी (दि. 26) द. आफ्रिकेविरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाबाद 74 धावांची जबरदस्त खेळी खेळली आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. भारताची अष्टपैलू खेळाडू स्नेह राणाकडे (sneh rana) उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गुजरात जायंट्सच्या (gujarat giants) मुख्य प्रशिक्षक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या रॅचेल हेन्स यांचा बेथ मुनीला कर्णधार बनवण्यात मोलाचा वाटा असल्याचे मानले जात आहे. 40 लाख मूळ किंमत असलेल्या मुनीला 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात 2 कोटींची मोठी रक्कम देऊन तिला गुजरात संघात सामील करण्यात आले होते.

वास्तविक 26 फेब्रुवारी रोजी संघाने आपली अधिकृत जर्सी देखील लाँच केली. त्या जर्सीच्या मागील बाजूस ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ऍश्ले गार्डनरचे नाव छापले होते. त्यामुळे चाहत्यांनी तिच गुजरातची कर्णधार असेल असा अंदाज बांधला, पण तसे झाले नाही आणि संघ व्यवस्थापनाने सोमवारी बेथ मुनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

विदेशी टी-20 लीगमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा मुनीचा हा पहिलाच अनुभव असेल. गतवर्षी लंडन स्पिरिटसाठी वुमेन्स हंड्रेड स्पर्धेत ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली होती. तिने महिला बिग बॅश लीगमधील काही सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे.

बेथ मुनीने गुजरात संघाचे कर्णधारपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ‘2023 मधील ऐतिहासिक महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन आवृत्तीत मला अदानी गुजरात जायंट्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. संघ लवकरच मैदानात उतरून डब्ल्यूपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात क्रिकेटचा एक मनोरंजक आणि प्रभावशाली ब्रँड सादर करण्यास उत्सुक आहे. स्नेह ही संघाची उपकर्णधार तर मिताली राज, रॅचेल हेन्स आणि नुशीन अल खादीर हे माजी दिग्गज खेळाडू संघाचे महत्त्वाचे भाग असणे माझ्यासाठी जमेची बाजू आहे.’

 

Back to top button