IPL 2023 : आयपीएलचे सामने ‘या’ नवीन नियमाने खेळवले जाणार! जाणून घ्या… | पुढारी

IPL 2023 : आयपीएलचे सामने ‘या’ नवीन नियमाने खेळवले जाणार! जाणून घ्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Impact Player : आयपीएलच्या 16 व्या हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेला केवळ एक महिना बाकी आहे. पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी रंगणार आहे. यंदाच्या आयपीएल सामन्यांचे आयोजन एकूण 12 मैदानांवर होणार असून यंदाच्या हंगामात एक नवीन नियम जोडण्यात आला आहे.

यावेळी जुन्याच फॉरमॅटमध्ये आयपीएलचे (IPL 2023) आयोजन होत असल्याने प्रत्येक संघाला होम आणि अवे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. गेल्या हंगामापासून आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नव्या संघांनी धडाक्यात एन्ट्री घेतली. त्यामुळे एकूण संघांची संख्या 10 झाल्याने 5-5 संघ दोन गटात विभागले गेले. यावेळीही संघांना गट-अ आणि गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे. (IPL 2023 Impact Player)

अ गटात मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स, तर ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे. प्रत्येक संघ त्याच्या गटातील संघाव्यतिरिक्त इतर गटातील इतर संघासोबत 2-2 सामने खेळेल, तर त्यादरम्यान त्यांचा इतर चार संघांविरुद्ध 1-1 सामना असेल.

आयपीएल 2023 चे ठिकाण

अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला या एकूण 12 शहरांमध्ये यावेळी आयपीएल 2023 चे आयोजन केले जाईल. गुवाहाटीला प्रथमच आयपीएल सामना आयोजित करण्याची संधी मिळाली आहे.

आयपीएल 2023 मधील नवीन नियम

बीसीसीआयने आयपीएल 2023 (IPL 2023)च्या मोसमात इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू केला आहे. हा नियम आयपीएलच्या इतिहासात प्रथमच वापरला जाणार आहे. याशिवाय मागील हंगामाच्या नियमांनुसार ही स्पर्धा खेळवली जाईल.

आयपीएल 2023 च्या प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक डावासाठी दोन डीआरएस असतील.

झेल बाद झाल्यानंतर मैदानात येणारा नवा खेळाडू हा स्ट्राईक घेईल.

कोविड-19 मुळे कोणताही संघ त्यांची प्लेइंग इलेव्हन पूर्ण करू शकला नाही तर बीसीसीआय सामना पुन्हा शेड्यूल करेल.

कोणत्याही कारणास्तव सामना पुन्हा शेड्यूल करता आला नाही, तर आयपीएलचे तांत्रिक समिती या प्रकरणाची चौकशी करेल.

प्लेऑफ/फायनलमध्ये असे असतील नियम

सुपर ओव्हर किंवा त्यानंतरची सुपर ओव्हर कोणत्याही कारणामुळे पूर्ण होऊ शकली नाही, तर लीगमध्ये अव्वल असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल.

इम्पॅक्ट प्लेयर नियम काय आहे? (IPL 2023 Impact Player)

सामन्यापूर्वी टॉसदरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांना त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागणार आहेत. या चार पर्यायी खेळाडूंपैकी फक्त एकच इम्पॅक्ट प्लेयर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतो. म्हणजे दोन्ही संघांकडून, या चार खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला डावाचे 14 वे षटक संपण्यापूर्वी त्या इम्पॅक्ट प्लेयरला मैदानात उतरवण्याची मुभा असेल. हा बदली खेळाडू प्लेईंग इलेव्हनमधील इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यास सक्षम असेल. म्हणजेच गोलंदाजीतही तो चार षटके टाकू शकतो. इम्पॅक्ट प्लेअर खेळात आल्यानंतर जो खेळाडू बाद होईल त्याला पुन्हा सामन्यात खेळता येणार नाही. षटक संपणे, विकेट पडणे किंवा खेळाडू दुखापतग्रस्त होणे अशा घटनांमध्येच इम्पॅक्ट प्लेयरला मैदानात उतरवले जाऊ शकते.

विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर होऊ शकतो का?

इम्पॅक्ट प्लेअर हा कर्णधाराची भूमिका बजावू शकणार नाही. हा खेळाडू भारतीय असावा. जर एखाद्या संघाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी खेळाडूला मैदानात उतरवायचे असेल, तर त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये तीनच विदेशी खेळाडूंना घ्यावे लागेल. बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे, एक संघ सामन्यावेळी चारच विदेशी खेळाडूंना मैदानात उतरवू शकतो. अशा परिस्थितीत जर संघाने सामना सुरू होण्यापूर्वी प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन विदेशी खेळाडूंची निवड केली तरच त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विदेशी खेळाडूला संधी देता येईल.

सामन्याची वेळ कमी झाल्यास या नियमाचे काय होईल?

खराब हवामान किंवा इतर परिस्थितींमुळे सामन्याची वेळ कमी होते. तेव्हा हा नियम थोडा क्लिष्ट होतो. जर सामना 10-10 षटकांनी कमी केला तर इम्पॅक्ट प्लेअर मैदानात उतरू शकणार नाही. जर सामना 10 षटकांपेक्षा जास्त असेल, तर सामन्याच्या नियमानुसार हा बदली खेळाडू येईल.

उदाहरणार्थ, 18-18 षटकांसाठी 13व्या षटकाच्या शेवटपर्यंत इम्पॅक्ट प्लेअर वापरण्याची परवानगी असेल. एखाद्या सामन्यात हा खेळाडू वापरल्यानंतर षटके कमी केल्यास, दुस-या संघाला खेळात कितीही षटके कमी केली गेली तरीही इम्पॅक्ट प्लेअरला खेळवण्याची परवानगी दिली जाईल.

Back to top button