Womens T20 WC : उपांत्य फेरीपूर्वी भारताला मोठा धक्का; पूजा वस्त्राकर संघातून बाहेर | पुढारी

Womens T20 WC : उपांत्य फेरीपूर्वी भारताला मोठा धक्का; पूजा वस्त्राकर संघातून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रित कौरचे खेळणे कठीण झाले आहे. यासह वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर महत्वाच्या सामन्यातून बाहेर पडली आहे. अशा स्थितीत भारतासाठी अंतिम फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. (Womens T20 WC)

महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर आजारी पडली असून पूजा वस्त्राकर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडली आहे. दुसरीकडे, हरमनप्रीत कौरला या सामन्यात खेळणे कठीण झाले आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया कमकुवत मानली जाते. अशा स्थितीत कर्णधार हरमनप्रीत बाहेर पडल्यास ऑस्ट्रेलियाला पराभूत भारतासाठी कठीण होईल. (Womens T20 WC)

पूजा वस्त्राकरला श्वास घेण्यास त्रास होत आहे. तिला घशाचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर कॅप्टन हरमनप्रीत अद्याप तापातून सावरलेली नाही. हरमनप्रीत कौर, पूजा वस्त्राकार आणि राधा यादव हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या चाचण्या केल्या होत्या. हरमनप्रीत या सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या वैद्यकीय पथक सर्व खेळाडूंची काळजी घेत आहे.

वेगवान गोलंदाजी अष्टपैलू पूजा वस्त्राकरच्या जागी फिरकी अष्टपैलू स्नेह राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर हरमनप्रीत न खेळल्यास स्मृती मानधना संघाची धुरा सांभाळेल. त्याचबरोबर हरमनप्रीत कौरऐवजी हरलीन देओल किंवा यास्तिका भाटियाला संघात संधी दिली जाऊ शकते.

या स्पर्धेत भारत चार सामन्यांतून सहा गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघ पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरला आणि त्यांचा एकमेव पराभव इंग्लंडविरुद्ध झाला. जर हरमनप्रीत हा सामना खेळला नाही तर उपकर्णधार स्मृती मानधना संघाचे नेतृत्व करू शकते. राधा यादवच्या तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण, ती आयर्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकली होती.

हेही वाचा;

Back to top button