IPL 2023 David Warner : डेव्हिड वॉर्नर होणार दिल्लीचा कॅप्टन! | पुढारी

IPL 2023 David Warner : डेव्हिड वॉर्नर होणार दिल्लीचा कॅप्टन!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 David Warner : आयपीएल 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदाचा पेच सोडवला आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. अपघातामुळे जखमी असणा-या ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नर दिल्लीचा कर्णधार असेल. तर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, अशी माहिती आयपीएलच्या वर्तृळातून समजते आहे.

दिल्ली फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाने याला दुजोरा दिला आहे. क्रिकबझ या क्रिकेटशी संबधीत संकेतस्थळाशी बोलताना ‘कॅपिटल्स’च्या एका सदस्याने सांगितले की, ‘डेव्हिड वॉर्नर आमचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल. यापूर्वी संघाची कमान ऋषभ पंतच्या हाती होती. अपघातामुळे पंत आयपीएलच्या 16व्या हंगामाला मुकणार आहे. यामुळे फ्रँचायझीकडून नवीन कर्णधार निवडण्याची प्रक्रिया सुरू होती. या निर्णयाची लवकरच घोषणा करण्यात येईल,’ अशी माहिती त्यांनी दिली. (IPL 2023 David Warner)

आयपीएल 2022 मध्ये, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या क्रमांकावर राहिला. संघाने एकूण 14 पैकी 7 सामने जिंकले आणि 7 गमावले. अशा स्थितीत यावेळी दिल्लीची कामगिरी कशी असेल, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वॉर्नर बराच काळ आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. (IPL 2023 David Warner)

संबंधित बातम्या

2022 मध्ये वॉर्नर दिल्ली संघात सामील झाला होता. त्याला फ्रँचायझीने मेगा लिलावात 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्या हंगामात वॉर्नरने चांगली कामगिरी केली. त्याने 12 सामन्यात 48 च्या सरासरीने 432 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.52 होता. वॉर्नरच्या बॅटमधून पाच अर्धशतके झळकली होती.

वॉर्नरची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द

डेव्हिड वॉर्नरने मे 2009 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो एकूण 162 आयपीएल सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना 42.01 च्या सरासरीने 5881 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 4 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 126 आहे.

Back to top button