WPL 2023 : डब्ल्यूपीएल स्पर्धेमध्ये ७० लाखांची अ‍ॅलिसा हिली यूपी वॉरियर्सची कर्णधार! | पुढारी

WPL 2023 : डब्ल्यूपीएल स्पर्धेमध्ये ७० लाखांची अ‍ॅलिसा हिली यूपी वॉरियर्सची कर्णधार!

पुढारी; पुढारी वृत्तसेवा : ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अ‍ॅलिसा हिलीकडे डब्ल्यूपीएलमधील यूपी वॉरियर्स संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. बुधवारी संघ व्यवस्थापनाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. या संघाने एलिसाला लिलावात 70 लाख रुपयांना विकत घेतले होते. (WPL 2023)

एलिसा ही महिला क्रिकेट जगातील सर्वात घातक सलामीवीरांपैकी एक आहे. यूपी वॉरियर्स संघामध्ये तिच्यासह 11 भारतीय आणि सहा विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचा 5 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता गुजरात जायंट्स विरुद्ध पहिला सामना रंगणार आहे. यूपी वॉरियर्स फ्रँचायझीने लिलावादरम्यान, आपल्या पर्समधील सर्व 12 कोटी रुपये खर्च केले होते. त्यांनी टीम इंडियाची स्टार गोलंदाज दीप्ती शर्माला 2.6 कोटींना विकत घेतले होते. ती यूपी वॉरियर्सची कर्णधार होईल अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. परंतु तिच्या ऐवजी ऑस्ट्रेलियन फलंदाज एलिसा हिली हिच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. फ्रँचायझीने सोफी एक्लेस्टोन (1 कोटी 80 लाख), ताहलिया मॅकग्रा (1 कोटी 40 लाख), देविका वैद्य (1 कोटी 40 लाख) यांना एलिसा पेक्षा जादा रक्कम खर्च करून संघात सामील करून घेतले होते. (WPL 2023)

हिलीची टी-20 कारकीर्द : हिलीने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघासाठी 137 टी-20 सामने खेळले असून 23.78 च्या सरासरीने 2,355 धावा फटकावल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 128.26 आहे. तिच्या खात्यात 13 अर्धशतकांसह 1 शतकाचा समावेश आहे. तर महिला बिग बॅश लीगमध्ये हिलीने 115 सामन्यांमध्ये जवळपास 30 च्या सरासरीने 2,976 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 5 शतके आणि 15 अर्धशतके फटकावली आहेत. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍यांमध्ये ती पाचव्या क्रमांकावर आहे.

अधिक वाचा :

Back to top button