Ashton Agar : ॲश्टन एगरने ऑस्ट्रेलियाची साथ सोडली, ‘या’ कारणामुळे मायदेशी रवाना

Ashton Agar : ॲश्टन एगरने ऑस्ट्रेलियाची साथ सोडली, ‘या’ कारणामुळे मायदेशी रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय दौरा ऑस्ट्रेलियन संघासाठी (ind vs aus test series) डोकेदुखी ठरत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ 2-0 ने पिछाडीवर आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जोश हेझलवूड दुखापतीमुळे आधीच बाहेर पडले आहेत. कौटुंबिक समस्येमुळे कर्णधार पॅट कमिन्स हा सुद्धा मायदेशी परतला आहे. तर मिशेल स्वेपसन पत्नीच्या प्रसुतीसाठी आधीच रजेवर गेला आहे. त्यातच आता फिरकीपटू ॲश्टन एगर (Ashton Agar) यानेही संघाची साथ सोडून मायदेश गाठल्याचे समोर आले आहे.

इंदौर येथे 1 मार्चपासून तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. नागपूर आणि दिल्ली कसोटीत ॲश्टन एगरला (Ashton Agar) प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. अशातच त्याने मायदेशातील शेफिल्ड शील्ड आणि मार्श कप या प्रतिष्ठीत स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचे तो प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी तो भारताचा दौरा सोडून मायदेशी रवाना झाला आहे.

दरम्यान, तिसर्‍या कसोटीसाठी कॅमेरून ग्रीन तंदुरुस्त होण्याची खात्री असल्याने ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या जागी अन्य फलंदाजाचा समावेश केलेला नाही. तर एगरच्या (Ashton Agar) जागीही पर्यायी खेळाडूचा अद्याप समावेश करण्यात आलेला नाही.

एगरने शेवटची कसोटी द. आफ्रिकेविरुद्ध सिडनी येथे खेळली. नॅथन लायनसह दुसरा फिरकीपटू म्हणून तो संघाचा भाग होता. मात्र, त्याला भारतात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाने ऑफस्पिनर टॉड मर्फी आणि कुहनेमन यांना पदार्पण करण्याचे संधी दिली. ऑस्ट्रेलियन संघ नागपुरात दोन आणि दिल्लीत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळला, पण आगर या दोन्ही सामन्यात बेंचवर बसला.

वनडे मालिकेसाठी एगर पुन्हा भारतात येणार

एगर कसोटी मालिकेतून बाहेर पडला असला तरी तो वनडे मालिकेचा भाग होण्यासाठी एगर पुन्हा भारतात परतेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. एगर या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी पुनरागमन करू शकतो. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या एगरने 5 कसोटी, 20 एकदिवसीय आणि 47 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 9, एकदिवसीय सामन्यात 18 आणि टी-20मध्ये 48 बळी आहेत. पदार्पणाच्या कसोटीत 11व्या क्रमांकावर येताना त्याने विक्रमी 98 धावांची खेळी खेळली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news