ICC Test Rankings : जगातील टॉप-5 अष्टपैलूंमध्ये तीन भारतीय खेळाडू | पुढारी

ICC Test Rankings : जगातील टॉप-5 अष्टपैलूंमध्ये तीन भारतीय खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Rankings : आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली असून यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा दिसत आहे. जगातील टॉप-5 अष्टपैलूंमध्ये 3 भारतीयांचा समावेश झाला. रवींद्र जडेजा (460 रेटिंग) अव्वल स्थानी, तर रविचंद्रन अश्विन (376) दुसऱ्या स्थानावर आहे. अक्षर पटेलला (283) कांगारूविरुद्ध झळकावलेल्या दोन अर्धशतकांचा फायदा झाला असून तो या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. बांगलादेशचा शाकीब अल हसन (329) तिस-या आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (320) चौथ्या स्थानी आहेत.

अँडरसन नवा नंबर-1 गोलंदाज

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे वय जसजसे वाढत आहे, तसतशी त्याची गोलंदाजी अधिकच धारधार होत आहे. याचा फायदा स्वत: अँडरसनलाही झाला आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाज क्रमवारीत पॅट कमिन्सला मागे टाकून अँडरसन जगातील नंबर-1 गोलंदाज बनला आहे. (ICC Test Rankings)

अँडरसनने वयाच्या 40 वर्षे 207 दिवसांत हा पराक्रम केला आहे. 1936 मध्ये माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज क्लेरी ग्रिमेट नंतर अव्वल रँकिंग मिळवणारा अँडरसन (866 रेटींग) हा सर्वात वयस्कर गोलंदाज आहे. त्याने कमिन्सची 1,466 दिवसांची राजवट संपुष्टात आणली असून आता कांगारू गोलंदाजाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

अँडरसनचा अव्वल होण्याचा ‘षटकार’

2003 मध्ये पदार्पण करणाऱ्या अँडरसनने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची ही सहावी वेळ आहे. मे 2016 मध्ये तो पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. यानंतर, 2018 मध्ये, तो पाच महिने अव्वल कसोटी गोलंदाज होता. त्यानंतर कागिसो रबाडाने त्याला मागे टाकले. आता अँडरसनने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो केवळ मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) यांच्या मागे आहे. अँडरसनने आतापर्यंत 178 कसोटी सामने खेळले असून 25.94 च्या सरासरीने 682 बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 7/42 अशी आहे. त्याला 32 वेळा पाच विकेट घेण्यात यश आले आहे. तर 3 वेळा सर्व सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. (ICC Test Rankings)

कसोटीत अव्वल स्थान मिळवणारे वयस्कर गोलंदाज (ICC Test Rankings)

बर्ट आयर्नमोंगर : 50 वर्ष 10 महिने (वय) : फेब्रुवारी 1933
क्लेरी ग्रिमेट : 44 वर्षे 2 महिने (वय) : फेब्रुवारी 1936
टिच फ्रीमन : 41वर्ष 2 महिने (वय) : जुलै 1929
सिडनी बार्न्स : 40 वर्षे 9 महिने (वय) : फेब्रुवारी 1914
जेम्स अँडरसन : 40 वर्षे 6 महिने (वय) : फेब्रुवारी 2023

अश्विन दुस-या स्थानी

भारताच्या अश्विननेही (864) गोलंदाजांच्या यादीत एका स्थानाची प्रगती केली आहे. तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच जडेजा (763) सात स्थानांची झेप घेऊन 9 व्या क्रमांकावर आला आहे. तर दिर्घकाळ क्रिकेटपासून लांब असलेला जसप्रीत बुमराह (795) पाचव्या स्थानी कायम आहे.

भारतीय महिला खेळाडूंची चमकदार कामगिरी

टीम इंडियाच्या महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोषने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले. तिने महिला टी-20 विश्वचषकात अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध 32 चेंडूत 44 धावा, आणि इंग्लंडविरुद्ध 34 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी केल्यानंतर ऋचा फलंदाजी क्रमवारीत 20 व्या स्थानावर पोहोचली. टॉप-20 यादीत स्थान मिळवणारी रिचा ही 5वी भारतीय फलंदाज आहे. तिच्याआधी स्मृती मानधना तिसऱ्या, शेफाली वर्मा 10व्या, जेमिमाह रॉड्रिग्स 12व्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौर 13व्या स्थानावर आहेत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज रेणुका सिंह गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहचली आहे. तिला 7 स्थानांचा फायदा झाला आहे.

Back to top button