

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा ऑफ-स्पिनर नॅथन लायनने (Nathan Lyon) दिल्ली कसोटीत इतिहास रचला. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 708 बळी घेणारा फिरकीचा बादशहा शेन वॉर्नला सुद्धा भारताविरुद्ध हा पराक्रम करता आलेला नाही, जो लायनने केला आहे.
लायनने (Nathan Lyon) भारताविरुद्धच्या 24* कसोटीच्या 43व्या डावात गोलंदाजी करताना 100 बळी पूर्ण केले. भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी करत, लायनने 34.34 च्या सरासरीने आणि 66.5 च्या स्ट्राइक रेटने विकेट्सचे शतक पूर्ण केले आहे. त्याने भारताविरुद्ध आठव्यांदा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध एका डावात 8/50 आणि एकूण सामन्यात 12/286 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. लायनने आपल्या एकूण कसोटी बळींपैकी 21.5 टक्के बळी हे भारताविरुद्ध घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने इंग्लंडविरुद्ध 101 विकेट्स घेतल्या आहेत.
शेन वॉर्नच्या फिरकीची जादू भारताविरुद्ध फारशी चालली नाही. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या 12 कसोटी सामन्यांच्या 22 डावांमध्ये त्याने 42.88 च्या सरासरीने आणि 83.7 च्या स्ट्राइक रेटने 42 बळी घेतले. भारताविरुद्ध वॉर्नची सर्वोत्तम आकडेवारी एका डावात 6/125 आणि एका सामन्यात 6/113 अशी राहिली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (बीजीटी) इतिहासात 100 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन यांच्यानंतर लायन हा तिसरा गोलंदाज आहे. बीजीटीमध्ये कुंबळेच्या नावावर 111 विकेट्स असून सध्या सुरू असलेल्या दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट्सचे शतक पूर्ण केले.
याशिवाय लायनने (Nathan Lyon) आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियाविरुद्ध त्याने आतापर्यंत 8 वेळा 5-5 बळी मिळवले असून त्याने श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुरलीधरनला मागे टाकले आहे. मुरलीने भारताविरुद्ध 7 वेळा पाच बळी घेण्यात घेण्यात यश आले आहे. तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन, इयान बॉथम, पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान आणि वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शल यांनी 6-6 वेळा अशी कामगिरी केली आहे.