ICC : कसोटी रँकिंगमधील ‘गोलमाल’; आयसीसीने केला ‘हा’ खुलासा… | पुढारी

ICC : कसोटी रँकिंगमधील 'गोलमाल'; आयसीसीने केला 'हा' खुलासा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुधवारी दुपारी आयसीसीच्या अपडेटमध्ये ११५ रेटिंग गुणांसह भारतीय संघ कसोटीमध्ये अव्वल स्थानी होता. तर दुसऱ्या क्रमांकावर १११ रेंटिंग गुणासह ऑस्ट्रेलिया संघ होता. बुधवारी संध्याकाळी क्रमवारीमध्ये आयसीसीने पुन्हा अपडेट केले. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ १२६ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी पुरुषांच्या कसोटी क्रमवारीतील चुकांबद्दल खुलासा केला आहे. वनडे आणि टी20 मध्ये भारत नंबर वनवर आहे. आयसीसीच्या तांत्रिक चुकीमुळे भारतीय संघ कसोटीच्यया क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचला होता. यामुळे टीम इंडिया तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये सहा तासांसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन टीम बनली. बुधवारी संध्याकाळी आयसीसीने पुन्हा क्रमवारीत बदल करत भारताला कसोटीतील पहिल्या क्रमांकावरून काढून ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान दिले.

गुरुवारी (दि.१६) आयसीसीने आपली तांत्रिक चूक मान्य करत घडलेल्या चुकीबद्दल खुलासा केला आहे. ICC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ फेब्रुवारी २०२३ रोजी ICC च्या वेबसाइटवर तांत्रिक बिघाडामुळे भारताला कसोटीतील अव्वल संघ घोषित केले होते. पुढे आयसीसीने म्हटले की, गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत. वेस्ट इंडिजविरुद्ध झिम्बाब्वेच्या दोन सामन्यांची मालिका संपल्यानंतरच्या ताज्या अपडेटनंतर ऑस्ट्रेलिया संघ आयसीसीच्या कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

बुधवारी (दि. १५) दुपारी आयसीसीच्या अपडेटमध्ये, तत्कालीन अव्वल क्रमांकावर असलेल्या भारताचे ११५ रेटिंग गुण होते, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे १११ रेटिंग गुण होते. बुधवारी संध्याकाळी पुन्हा क्रमवारी अपडेट करण्यात आली तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ १२६ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला. तर भारताचे रेटिंग गुण ११५ होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

गेल्या महिन्यातही झाली होती अशीच चूक

या वर्षी जानेवारी महिन्यातही आयसीसीने क्रमवारीत अशीच मोठी चूक केली होती. त्यावेळी भारताला नंबर वन कसोटी संघ घोषित करण्यात आले. अडीच तासांनंतर भारतीय संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आला होता. त्यानंतर आयसीसी क्रमवारीतील प्रचंड घसरणीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नव्हते.

हेही वाचा;

Back to top button