पुढारी ऑनलाईन डेस्क : सेल्फी घेण्यास नकार दिल्याने आठ जणांच्या टोळक्याने क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारची तोडफोड केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.१६) रात्री मुंबईत घडला. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर एका महिला आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. ओशिवारा पोलिसांच्या माहितीनुसार, सपना गिल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पृथ्वी शॉच्या संबंधितांनी याबाबत सांगितले की, पृथ्वी शॉ सांताक्रुज येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. यानंतर एक व्यक्ती तेथे आला. सेल्फीसाठी त्याने पृथ्वी शॉकडे विचारणा केली. यावेळी पृथ्वीने त्याला नाराज न करता त्याला सेल्फी काढून दिला. दरम्यान, काही वेळाने हा व्यक्ती आपल्या काही मित्रांसमवेत तेथे आला. मित्रांबरोबरही सेल्फी घेण्याचा आग्रह करु लागला. याला पृथ्वी शॉने सांगितले की, मी मित्रासोबत जेवण करण्यासाठी आलो आहे. आम्हाला यामध्ये व्यत्यय नको आहे. मात्र चाहते सेल्फीसाठी आग्रही राहिले. अखेर पृथ्वीने हॉटेलच्या मॅनेजरकडे तक्रार केली. हॉटेल मॅनेजरने सेल्फीसाठी विचारणा करणाऱ्या लोकांना बाहेर जाण्यास सांगितले.
पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र हॉटेलमधून जेवण करुन बाहेर पडत होते. त्यावेळी काहीलोक बेसबॉल स्टिक घेऊन बाहेर उभारले होते. या लोकांनी पृथ्वीच्या कारच्या काचा फोडल्या. यावेळी पृथ्वी शॉही या कारमध्ये होता. तक्रारीत म्हटले आहे की, हल्ला झाला तेव्हा पृथ्वी शॉ कारमध्येच होता. त्याला कोणताही वाद नको होता. त्यामुळे पृथ्वीला दुसऱ्या कारमधून पाठवण्यात आले. याठिकाणी एक महिला आली. तिने पृथ्वी शॉकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच ५० हजार दिले नाहीत तर खोट आरोप लावण्यात येतील, अशा प्रकारची धमकीही संबंधित महिलेने दिली. यानंतर पृथ्वीच्या मित्राने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.