नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा आपल्या कारकिर्दीतील शंभरावा सामना राजधानीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पुजाराने आपल्या 100 व्या कसोटीत (IND vs AUS) शतक झळकावले तर तो अनेक विक्रम मोडेलच, पण 100 व्या कसोटीत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडूही ठरेल.
पुजाराने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कसोटी मालिकेत तो नागपुरात त्याच्या कारकिर्दीतील 99 वी कसोटी खेळला. 17 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवर त्याला इतिहास रचण्याची संधी आहे. आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाने आपल्या 100 व्या कसोटीत शतक झळकावलेले नाही. पुजारा भारताकडून 100 कसोटी खेळणारा 13 वा फलंदाज ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि मोदी यांनी त्याला शंभराव्या कसोटीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पुजाराची पत्नी पूजा हीदेखील उपस्थित होती. विशेष म्हणजे या सामन्याप्रसंगी पुजाराचे सर्व कुटुंब उपस्थित राहणार आहे. या लढतीत तो कसोटी कारकिर्दीतील 20 वे शतक झळकावणार काय, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, नागपूर कसोटीत तो केवळ 7 धावा करून बाद झाला होता.
जगभरातील 10 फलंदाजांनी त्यांच्या 100 व्या कसोटीत शतक झळकावले आहे. इंग्लंडचा कॉलिन कॉड्रे हा आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात शतक करणारा पहिला खेळाडू होता. तसेच देशासाठी 100 कसोटी सामने खेळणारा तो पहिला खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा आपल्या 100 व्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. पॉन्टिंगने 2006 मध्ये सिडनी येथे दक्षिण आफ्रिके विरुद्ध नाबाद 120 आणि 143 धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नर 100 व्या कसोटीत शतक झळकावणारा 10 वा फलंदाज ठरला होता. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते.
पुजाराला या कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने सध्या कांगारू विरुद्ध 21 सामन्यांच्या 38 डावांत 1900 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 5 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. पुजाराने दिल्ली कसोटीत 100 धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत 2000 धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरू शकतो. याशिवाय, जर त्याने या सामन्यात 244 धावा केल्या तर तो द्रविडच्या पुढे जाईल.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर आहे. या मैदानावर कांगारू संघाविरुद्धच्या कसोटीत त्याने 259 धावा केल्या होत्या. त्याचवेळी सचिनने तीन सामन्यांत 158 धावा केल्या होत्या. पुजारा केवळ 24 धावांनी मागे आहे.
पुजारापेक्षा जादा कसोटी सचिन तेंडुलकर (200), राहुल द्रविड (163), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावस्कर (125), दिलीप वेंगसाकर (116), सौरव गांगुली (113), विराट कोहली (105), इशांत शर्मा (105), हरभजन सिंग (103) आणि वीरेंद्र सेहवाग (103) यांनी खेळले आहेत.
हेही वाचा :