IND vs AUS Most Wickets : नॅथन लायन आणि अश्‍विन भिडणार 'नंबर १'साठी!,कुंबळेचा विक्रम मोडण्‍याची संधी | पुढारी

IND vs AUS Most Wickets : नॅथन लायन आणि अश्‍विन भिडणार 'नंबर १'साठी!,कुंबळेचा विक्रम मोडण्‍याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवार, ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरु होत आहे. ही मालिका भारताचे कसोटी विश्‍वचषकमधील भवितव्‍य ठरवणारी आहे. मालिकेतील चार सामन्‍यांपैकी दोन किंवा तीन सामने जिंकले तर कसोटी विश्‍वचषकाच्‍या अंतिम सामन्‍यात टीम इंडिया धडक मारेल. या मालिकेत ऑस्‍ट्रेलियाचा नॅथन लायन आणि भारताचा अश्‍विन यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. ( IND vs AUS Most Wickets ) कारण  भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील कसोटी मालिकेतील सर्वाधिक विकेट घेत नवा विक्रम करण्याची संधी दोन्ही फिरकीपटूंना आहे.

IND vs AUS Most Wickets: सर्वाधिक विकेट आहेत कुंबळेच्‍या नावावर

भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन आणि ऑस्‍ट्रेलियाचा प्रभावी फिरकीपटू नॅथन लायन हे आमने-सामने असतील. भारत आणि ऑस्‍ट्रेलिया मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्‍याचा विक्र भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या नावावर आहे. त्याने ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध २० कसोटी सामन्‍यांत १११ विकेट घेतल्‍या आहेत. तर नॅथन लायन याने २२ सामन्‍यांत ९४ तर अश्‍विन याने १८ सामन्‍यांत ८९ विकेट आपल्‍या नावावर केल्या आहेत. त्‍यामुळे गुरुवारपासून दोन्‍ही फिरकी गोलंदाजांना आता कुंबळेचा विक्रम मोडण्‍याची संधी आहे. कुंबळेचा विक्रम मोडण्‍यासाठी लायन याला केवळ १८ तर अश्‍विन याला २३ विकेटची गरज आहे. त्‍यामुळे क्रिकेटप्रेमींचे या दोन्‍ही फिरकी गोलंदाजांच्‍या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.

हरभजन सिंगलाही टाकणार मागे

या मालिकेत हरभजन सिंगचा विक्रम मागे टाकण्‍याची संधी लायन आणि अश्‍विन यांना आहे. भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणार्‍या फिरकी गोलंदाजामध्‍ये हरभजन सिंग दुसर्‍या क्रमाकावर आहे. त्‍याने १८
सामन्‍यांमध्‍ये ९५ विकेट घेतल्‍या आहेत. हरभजनला मागे टाकण्‍यासाठी लायन याला दोन तर अश्‍विन याला केवळ सात विकेट घेण्‍याची गरज आहे. या मालिकेतील चार सामन्‍यात दोन्‍ही फिरकीपटूंना हा विक्रम सहज मोडता येईल, असे मानले जात आहे.

अष्‍टपैलू जडेजालही असेल नवा विक्रम करण्‍याची संधी

भारत आणि ऑस्‍ट्रेलिया कसोटी मालिकेतून भारताचा अष्‍टपैलू खे‍‍ळाडू रवींद्र जडेजा पुनरागम करत आहे. मागील वर्षी आशिया कप स्‍पर्धेत तो जखमी झाला होता. त्‍यामुळे टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेला त्‍याला मुकावे लागले होते. आता ऑस्‍ट्रेलियाविरुद्धच्‍या मालिकेत भारताचा माजी कर्णधार कपिल देव याचा विक्रम मोडण्‍याची त्‍याला संधी आहे. कपिल देव याने ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध २० कसोटी सामन्‍यात ७९ विकेट घेतल्‍या आहेत. तर रवींद्र जडेजा याने १२ कसोटी सामन्‍यात ६३ विकेट आपल्‍या नावावर केल्‍या आहेत. या मालिकेत त्‍याने १७ विकेट घेतल्‍या तर तो कपिल देवचा विक्रम मोडू शकतो.

हेही वाचा : 

 

 

Back to top button