IND vs AUS Test : पहिल्‍या कसोटीत तिसरा फिरकीपटू कोण? माजी क्रिकेटपटूंनी दिले उत्तर... | पुढारी

IND vs AUS Test : पहिल्‍या कसोटीत तिसरा फिरकीपटू कोण? माजी क्रिकेटपटूंनी दिले उत्तर...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरु होत आहे. या सामन्‍यात तिसरा फिरकीपटू कोण असेल? यावर सध्‍या खल सुरु आहे. या प्रश्‍नावर माजी क्रिकेटपटू आणि निवडकर्ते यांनी उत्तर दिले आहे. ( IND vs AUS Test )

कसोटी सामन्‍याच्‍या तिसर्‍या दिवसांपासून बाऊन्स सुरू होईल, अशी खेळपट्टी बनवण्यास प्राधान्‍य असेल, असे मानले जात आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांमध्‍ये भारतीय फलंदाज उसळत्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसले आहेत. बांगलादेश कसोटीवेळी मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन आणि तैजुल इस्लाम या गोलंदाजांनी मीरपूरमधील दुसऱ्या कसोटीत भारताला अवस्‍था बिकट केली होती. त्‍यामुळे ऑस्‍ट्रेलिया विरुद्धच्‍या कसोटीतही उसळत्‍या खेळपट्टीचे आव्‍हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे.

IND vs AUS Test :  निवड  खेळपट्टीवरच ठरेल : मुरली कार्तिक

पहिल्‍या कसोटीसाठी संघात तिसरा फिरकीपटू कोण असावा, यावर माजी कसोटी फिरकीपटू मुरली कार्तिक म्हणाला की,
” आमच्या फलंदाजांना उसळत्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी खेळताना त्रास होतो. मला माहित नाही की, नागपूर येथे कोणत्या प्रकारची खेळपट्टी दिली जाईल;पण उसळती खेळपट्टी उलटसुलट होऊ शकते. देशांतर्गत स्तरावरही स्पिनर्सना चांगले खेळू शकणारे फारसे खेळाडू नाहीत. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्‍यापैकी भारतासाठी तिसरा फिरकीपटूची निवड ही खेळपट्टीवर अवलंबून असेल.”

कुलदीप यादव हा सपाट खेळपट्टीवर चांगला पर्याय आहे. मात्र कसोटी सामन्‍याच्‍या दुसर्‍या दिवसापासून चेंडू उसळी घ्यायला लागला तर अक्षर पटेल हा चांगला पर्याय ठरु शकतो; पण तिसऱ्या फिरकीपटूचा फारसा उपयोग होत नाही कारण तुम्हाला तुमच्या दोन प्रमुख फिरकीपटूंकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे, असेही कार्तिक याने स्‍पष्‍ट केले.

IND vs AUS Test : अक्षर पटेल ठरेल चांगला पर्याय : जतीन परांजपे

माजी राष्ट्रीय निवडकर्ते जतीन परांजपे यांनी सांगितले की, “अक्षर पटेल हा रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासोबत तिसरा फिरकी गोलंदाज असावा. त्याचा फॉर्म पाहता तो माझी पहिली पसंती असेल. बाऊन्स खेळपट्टी बनवून भारत स्वत:च्‍या अडचणीत भर टाकणार नाही. सामन्‍याच्‍या दुसऱ्या दिवसापासून वळण घेणारी खेळपट्टी चांगली ठरेल. यावर कर्णधार रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा आणि विराट कोहली हे ऑस्‍ट्रेलियाचा फिरकीपटू लायन याचा चांगला सामना करतील, असा
विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. देवांग गांधी यानेही अक्षर पटेल हाच तिसरा फिरकीपटू असावा, असे म्‍हटले आहे.

शुभमन गिल असावा सलामीवीर : एमएसके प्रसाद

माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, “मागील काही सामन्‍यातील दमदार फलंदाजीमुळे शुभमन गिलचा आत्मविश्वास खूपचा वाढला आहे. याचा संघाला खूपच फायदा होईल. पहिल्‍या कसोटी सामन्‍यात शुभमन यालाच सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले पाहिजे. केएल राहुल कसोटीत पाचव्या क्रमांकावर खेळताना कोणतीही अडचण नाही. मात्र सलामीसाठी शुभमन यानेच आले पाहिजे.” अक्षर पटेल आणि कुलदीप यांच्यात निवड करणे थोडे अवघड जाईल, असेही प्रसाद यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

 

 

 

 

Back to top button