Australian Open | माटोस- स्टेफनी यांना ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद, सानिया मिर्झा- रोहन बोपण्णा यांचा पराभव | पुढारी

Australian Open | माटोस- स्टेफनी यांना ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद, सानिया मिर्झा- रोहन बोपण्णा यांचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझिलच्या राफेल माटोस आणि लुईसा स्टेफनी यांनी ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तर भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्टेफनी-माटोस यांनी सानिया- बोपण्णा यांचा ७-६, ६-२ असा पराभव करत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

सानियाच्या कारकिर्दीतील ही ११वी ग्रँडस्लॅम स्पर्धेतील फायनल होती. दुसरीकडे बोपण्णाची ही चौथी ग्रँडस्लॅम फायनल होती. सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि अमेरिकेच्या डेसिरिया क्रॉझिक यांचा ७(७)-६(५), ६(५)-७(७), १०-६ असा पराभव केला होता. तत्पूर्वी, भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जेलेना ओस्टापेन्को आणि डेव्हिड वेगा हर्नांडेझ या जोडीविरुद्ध वॉकओव्हर मिळाला (सामना रद्द झाला) होता.

अंतिम सामन्यातील पराभवानंतर सानिया मिर्झा भावूक झाली. रॉड लेव्हर अरेना कोर्टवर आपल्या भावना व्यक्त करताना तिला अश्रू अनावर झाले. ”मी अजून काही स्पर्धा खेळणार आहे. पण माझ्या कारकिर्दीची सुरुवात मेलबर्नमध्ये २००५ मध्ये झाली होती. जेव्हा मी १८ वर्षांची असताना इथे खेळले. माझे शेवटचे ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यासाठी मी यापेक्षा चांगल्या मैदानाचा विचार करू शकत नाही, अशी भावना सानिया मिर्झाने व्यक्त केली. ग्रँडस्लॅममध्ये मी माझ्या मुलासमोर खेळेन असे मला कधीच वाटले नव्हते, असेही ती यावेळी म्हणाली.

 हे ही वाचा :

Back to top button