क्रिकेट ते हॉकी… न्‍यूझीलंड पुन्‍हा ‘व्‍हिलन’ आणि भारताचा पुन्‍हा ‘स्‍वप्‍नभंग’!

क्रिकेट ते हॉकी… न्‍यूझीलंड पुन्‍हा ‘व्‍हिलन’ आणि भारताचा पुन्‍हा ‘स्‍वप्‍नभंग’!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हॉकी विश्वचषक 2023 च्या क्रॉस-ओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. न्‍यूझीलंड संघाच्‍या या कामगिरीमुळे हॉकी विश्वचषक 2023 मधील भारताच्‍या प्रवासाला पूर्णविराम मिळाला. संघासह भारतीय हॉकीप्रेमींचे १९७५ नंतर पदक जिंकण्याचे स्‍वप्‍न पुन्‍हा एकदा भंगले. भारतीयांचा असा 'स्‍वप्‍नभंग' होण्‍याची ही पहिली वेळ नाही. मागील सलग चार वर्ष न्‍यूझीलंड संघानेच क्रिकेट ते हॉकी स्‍पर्धेत भारतीय संघाला बाहेरचा रस्‍ता दाखवला आहे. रविवारी त्‍याचीच पुनरावृत्ती झाली. जाणून घेवूया क्रिकेट ते हॉकी स्‍पर्धेतील भारतीय संघाच्‍या 'स्‍वप्‍नभंग' मालिकेतील सामन्‍यांविषयी…

2023 हॉकी विश्‍वचषक स्‍पर्धा

२०२३ हॉकी स्‍पर्धेत भारतीय संघाची वाटचाल दमदार सुरु होती. ग्रुप डीमधील भारतीय संघाने दोन सामने जिंकले तर
इंग्‍लंडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. त्‍यामुळे उपांत्यपूर्व फेरीत जाण्‍यासाठी भारताला क्रॉस-ओव्हर सामना खेळावा लागला. हा सामना जिंकला असता तर भारतीय संघाने उपांत्‍यपूर्व फेरीत प्रवेश केला असता. भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. कारण हॉकीमध्ये आपल्‍या संघाची कामगिरी नेहमीच न्‍यूझीलंडपेक्षा सरस राहिली आहे. मागील सर्व रेकॉर्डही भारताच्‍या बाजूने होते. तरीही पूर्णवेळ खेळ होईपर्यंत दोन्ही संघांमधील सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व असले तरी न्यूझीलंड संघाने कडवी झुंज दिली. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मिळवला. भारताचा विश्‍वचषकातील प्रवास थांबला.

२०२१ T20 विश्वचषक

२०२१ मध्‍ये T20 विश्वचषकात स्‍पर्धेत भारतीय संघात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा समावेश होता. या स्‍पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर स्पर्धेत आपले अस्‍तित्‍व टिकण्यासाठी भारताला न्यूझीलंडचा पराभव करणे अनिवार्य होते; पण पुन्‍हा एकदा न्‍यूझीलंड संघ 'भिंत' म्‍हणून भारतासमोर उभा राहिला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला छोट्या धावसंख्येवर रोखले आणि त्यानंतर किवी फलंदाजांनी लक्ष्य सहज गाठले. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशाच संपुष्टात आल्या आहेत. टीम इंडियाने उर्वरित सर्व सामने जिंकले, मात्र न्‍यूझीलंड विरुद्‍धचा पराभव हाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्‍यासाठी मुख्‍य अडसर ठरला आणि भारतासाठी न्‍यूझीलंडचा संघ पुन्‍हा एकदा 'व्‍हिलन' ठरला.

कसोटी विश्‍वचषक २०२१

कसोटी विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात भारताने धडक मारली. टीम इंडिया सवोत्‍कृष्‍ट कसोटी खेळत होती.
न्‍यूझीलंड विरुद्‍धच्‍या अंतिम सामना १८ ते २३ जून २०२१ दरम्‍यान इंग्लंडच्या साउथहँप्टन मधील रोझ बोल खेळवला गेला. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने सर्वोत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत पहिला वहिला कसोटी विश्वचषक जिंकला आणि पुन्‍हा एकदा भारताला विश्‍वचषकापासून लांब राहावे लागले.

२०१९ वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धा

२०१९ क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय संघ हा प्रमुख दावेदार मानला जात होता. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सर्वच खेळाडूंनी उत्‍कृष्‍ट प्रदर्शन केले होते. भारतीय संघाने उपांत्‍य फेरीत धडक मारली. न्‍यूझीलंड विरुद्‍धचा सामना जिंकून टीम इंडिया सहज फायनलमध्‍ये पोहचेल, असा अंदाज क्रिकेटप्रेमी व्‍यक्‍त करु लागले. मात्र उपांत्‍य फेरीत उलटपेर झाला. न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करुन फायनलमध्ये धडक दिली. संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला न्यूझीलंडने स्पर्धेबाहेर काढत देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्‍का दिला होता.

क्रिकेट ते हॉकी …न्‍यूझीलंडचे 'विघ्‍न' कायम

क्रिकेट असो की हॉकी, विश्‍वचषक स्‍पर्धेतील महत्त्‍वपूर्ण सामन्‍यात सलग चारवेळा न्‍यूझीलंडच्‍या संघानेच भारताचा पराभव केला आहे. रविवारी पुन्‍हा एकदा त्‍याची पुनरावृत्ती झाली आणि कोट्यवधी भारतीयांचा सलग चौथ्‍यांदा स्‍वप्‍नभंग करण्‍यासाठी  न्‍यूझीलंडचा संघच कारणीभूत ठरला आणि मागील तीन पराभवांच्‍या कटू आठवणींना पुन्‍हा एकदा उजाळा मिळाला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news