Hockey World Cup : भारताचे स्वप्न भंगले! | पुढारी

Hockey World Cup : भारताचे स्वप्न भंगले!

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : हॉकी विश्वचषक 2023 च्या क्रॉस-ओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यासह भारताचा हॉकी विश्वचषक 2023 पर्यंतचा प्रवास संपला आहे. पूर्णवेळ खेळ होईपर्यंत दोन्ही संघांमधील सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व असले तरी न्यूझीलंड संघाने यजमानांना कडवी झुंज दिली. (Hockey World Cup)

भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यासह 1975 नंतर पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्नही भंगले आहे. क्रॉसओव्हर मॅचमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. निर्धारित 60 मिनिटांपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मिळवला. टीम इंडियाचे गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि क्रिशन पाठक यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये एकूण चार सेव्ह केले. असे असूनही भारताला विजय मिळवता आला नाही. (Hockey World Cup)

या सामन्यात भारताने 17 व्या मिनिटाला शानदार गोल केला. त्यानंतर भारताने दुसरा गोल 24 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केला. त्यामुळे भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र, चार मिनिटांत नंतर न्यूझीलंडच्या सॅम लेनने पहिला गोल करत स्कोअर 2-1 असा केला. हाफटाईमनंतर तिसर्‍या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी वाढवली आणि तिसरा गोल केला.

टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र किवी संघाने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने अजून दोन गोल करून भारतीय खेळाडू आणि चाहत्यांना चकित केले. न्यूझीलंडने सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर बरोबरी साधली आणि नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवला. भारताकडून या सामन्यात ललित उपाध्याय, वरुण कुमार आणि सुखजित सिंग यांनी गोल केले. टीम इंडिया 2018 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली होती.

हेही वाचा;

Back to top button