मिशन खेलो इंडिया युथ गेम्स : महाराष्ट्राचे युवा शिलेदार पदकाच्या तिहेरी शतकासाठी सज्ज | पुढारी

मिशन खेलो इंडिया युथ गेम्स : महाराष्ट्राचे युवा शिलेदार पदकाच्या तिहेरी शतकासाठी सज्ज

पुणे, पुढारी वृत्तसेवा : गुजरात मधील नॅशनल गेम्समधील पदकांची मोहीम फत्ते केल्यानंतर आता महाराष्ट्राचे युवा शिलेदार पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये विक्रमी पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. दोन वेळा २०० पेक्षा अधिक पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्र संघाची नजर आता मध्यप्रदेशातील स्पर्धेत पदकांचे तिहेरी शतक साजरे करण्यावर लागली आहे. येत्या ३० जानेवारीपासून मध्य प्रदेशमध्ये पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा ३७५ सदस्य संघ सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील सुपरस्टार युवा खेळाडू या स्पर्धेदरम्यान २२ खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्राचा जलतरण संघ सर्वात मोठा ठरत आहे. या संघामध्ये ३६ जलतरणपटूंचा समावेश आहे. त्या पाठोपाठ जिम्नॅस्टिक, ऍथलेटिक आणि तलवारबाजीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या संघामध्ये प्रत्येकी २९ खेळाडूंचा समावेश आहे.

दोन वेळा महाराष्ट्र संघ चॅम्पियन

महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मधील कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. तळागाळातील गुणवंत युवा खेळाडूंनी २०१९ आणि २०२० मध्ये महाराष्ट्राला चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवून दिला. २०२० मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघाने विक्रमी २५६ पदकांची कमाई केली होती. यादरम्यान महाराष्ट्र संघाने ७८ सुवर्णपदकांचा बहुमान पटकावला होता. तसेच २०१९ मध्ये पुणे येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघ २२८ पदकांचा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला होता.

क्रीडा नगरीमध्ये सोनेरी यशासाठी कसून सराव

महाराष्ट्राची क्रीडा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील बालेवाडीमध्ये महाराष्ट्राचे युवा खेळाडू सोनेरी यशासाठी कसून सराव करताना दिसत आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षक आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण क्रीडा धोरणातून युवा कसून सराव करण्याची संधी मिळाली आहे. क्रीडा आयुक्त आणि उपसंचालकाची पथक यासाठी कसून मेहनत घेत आहे. त्यामुळे पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर महाराष्ट्राचे खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेची तयारी करत आहे.

योगासन, मल्लखांब, कुस्ती, कबड्डीमध्ये प्रबळ दावेदार

पारंपारिक वारसा लाभलेल्या योगासन मल्लखांब या खेळ प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गुजरात मधील नॅशनल गेम्समध्ये सोनेरी यशाचा पल्ला गाठला. त्यामुळे आता याच कामगिरीला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्राचे खेळाडू सज्ज झाले आहेत. यातून महाराष्ट्र संघाला योगासन, मल्लखांब, कबड्डी, खो-खो आणि कुस्ती या खेळ प्रकारात सोनेरी ही यशाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मल्लखांब आणि योगासन या खेळामध्ये महाराष्ट्राचे युवा खेळाडू निश्चितपणे मोठ्या संख्येत पदकांची कमाई करताना दिसतील.

निश्चितपणे महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल : क्रीडा आयुक्त

गुजरात येथील नॅशनल गेम आणि महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक स्पर्धेदरम्यान युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनत करत मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे याच कामगिरीला उजाळा देत महाराष्ट्राचे खेळाडू मध्य प्रदेश येथील खेलो इंडिया युथ गेम्स गाजवतील. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबिरातून हे खेळाडू कसून मेहनत करत आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून हे खेळाडू आपल्या गुणवत्तेचा दर्जा उंचावत आहेत. यातून महाराष्ट्र संघ निश्चितपणे या स्पर्धेदरम्यान सर्वसाधारण विजेते पदाचा मानकरी ठरेल, असा विश्वास क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.

२२खेळामध्ये महाराष्ट्राचे ३७५ खेळाडू

मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्राचे ३७५ खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू २२ खेळ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. यामध्ये टेबल टेनिस, खो- खो, बॉक्सिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, तिरंदाजी, नेमबाजी, कयाकिंग-कनोइंग, योगासन, गटका, सायकलिंग ट्रॅक, ॲथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, तलवारबाजी, कुस्ती आणि जलतरण या खेळ प्रकारांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button