पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India All Out Record : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना 8 गडी राखून जिंकला. मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली. दुसरी वनडे जिंकून भारतीय संघाने मालिका 2-0 अशी खिशात घातली. याचबरोबर टीम इंडियाने विश्वचषकातील एका विक्रमाची बरोबरी केली, जो फक्त पाकिस्तान संघ करू शकला होता.
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना हा टीम इंडियाचा 1025 वा सामना होता. या सामन्यात भारताने किवी संघाला 108 धावांवर ऑलआउट केले. भारताने एकूण एकदिवसीय सामन्यांमध्ये 320 व्यांदा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआउट केले आहे. अशी कामगिरी करणारा तो दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानने त्यांच्या 948 सामन्यांपैकी 320 वेळा विरोधी संघाला ऑलआउट केले आहे.
भारतीय संघाने या मोठ्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. त्याचवेळी, पाच वेळा वनडे विश्वचषक जिंकणा-या ऑस्ट्रेलियाने 410 वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट केले आहे.
कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत पाहुण्या न्यूझीलंडला झटके दिले. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या जोडगोळीने डावाच्या सुरुवातीला धोकादायक गोलंदाजी करून किवींची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. शमीने 3, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 विकेट घतल्या तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांना एक-एक बळी मिळवण्यात यश आले. न्यूझीलंडचा संघ केवळ 108 धावांत सर्वबाद झाला. यानंतर रोहित शर्माने 51 आणि शुभमन गिलने 40 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.