पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Retirement : मागिल वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो सध्या न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. या सगळ्या दरम्यान रोहितच्या भविष्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या वर्षी तो एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो असा अंदाज काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केले. टी-20 विश्वचषक स्पर्धेपासून त्याने भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. हेही तितके खरे आहे.
इनसाइड स्पोर्टस या वेबसाईटच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर एक किंवा दोन फॉरमॅटमधून निवृत्त होऊ शकतो. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टसला याबाबत माहिती दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. या अधिका-यांनी म्हटलंय की, 'भावी कर्णधारपदाबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. रोहित हा सध्या कर्णधार आहे . त्याच्यानंतर कोण या पदावर असेल त्याबाबत वन-डे विश्वचषकानंतर चर्चा होईल. रोहित विश्वचषकानंतर त्याच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ शकतो. हार्दिकला एकदिवसीय उपकर्णधारपद सोपवण्यात आले असून, तो भविष्यातही उपकर्णधारपद स्वीकारू शकतो.'
36 वर्षीय रोहित शर्मानंतर केएल राहुल कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधार केले जाऊ शकते. त्याचवेळी, हार्दिक पंड्या टी-20 आणि वनडेमध्ये संघाचा कर्णधार होण्यासाठी मोठा दावेदार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टसला सांगितले की, 'केएल राहुल कसोटीत उपकर्णधार आहे. या फॉरमॅटमध्ये उत्तराधिकारी कोण असेल ते समजू शकता. पुजारा आणि ऋषभ हे दोघेही कसोटीत उत्तम आहेत. त्यामुळे उपकर्णधार पदासाठी पर्यायांची कमतरता नाही. हार्दिक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे. तो तरुण आहे. सध्या तरी रोहितनंतर हार्दिक शिवाय इतर चांगला पर्याय नाही. त्यामुळे या युवा खेळाडूला पाठिंबा देणे आवश्यक आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर बोर्डाला 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा संघ तयार करायचा आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी 20 मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले नाही. आता न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही या ज्येष्ठ खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही. (Rohit Sharma Retirement)