Brij Bhushan Singh : दहा कोटींची संपत्ती.. दबंग कारकीर्द… सहा वेळा खासदार! | पुढारी

Brij Bhushan Singh : दहा कोटींची संपत्ती.. दबंग कारकीर्द... सहा वेळा खासदार!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने सध्याचे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला. बृजभूषण (Brij Bhushan Singh) यांच्याविरुद्ध देशातील प्रसिद्ध कुस्तीपटूंनी गेल्या दोन दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी हे कुस्तीपटू करत आहेत. सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या सिंह यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत.

भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह हे काही पहिल्यांदाच वादाच्या भोवर्‍या सापडलेले नाहीत. (Brij Bhushan Singh) यापूर्वीही अनेक वेळा ते वादात सापडले आहेत. त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल झाले होते. मध्यंतरी त्यांनी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रोखला होता. त्यानंतर ते महाराष्ट्राला परिचित झाले. मात्र बृजभूषण सिंहांनी यापेक्षाही अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनादेखील आपला निर्णय मागे घ्यायला लावला होता.

मायावतींना निर्णय मागे घ्यायला लावला

बृजभूषण शरण सिंह हे सहाव्यांदा खासदार झाले आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत, मात्र त्यांनी अनेकवेळा पक्ष बदलला आहे. बृजभूषण यांची राजकीय कारकीर्ददेखील वादांनी भरलेली आहे. त्यांचा एक 2004 चा किस्सा खूप प्रसिद्ध आहे. त्यावेळच्या मुख्यमंत्री मायावती यांनी गोंडाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाला खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उघड उघड विरोध केला होता. बृजभूषण सिंह हे हजारो लोकांसह रस्त्यावर उतरले. कडवा विरोध पाहून तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

बाबरी प्रकरणातही गुन्हा दाखल

बृजभूषण हे कट्टर रामभक्त आहेत. ते राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख चेहरा आहेत. बाबरी मशिद वादग्रस्त ढाचा विध्वंसप्रकरणी लालकृष्ण अडवाणी, कल्याण सिंह, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 40 जणांना अटक करण्यात आले होते. त्यात बृजभूषण यांचेदेखील नाव होते. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2020 मध्ये दोषमुक्त करण्यात आले.

टाडा लागलेले बृजभूषण हे नाव अंडरवर्ल्डशीही जोडले गेले

बृजभूषण सिंह यांचे संबंध अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचे आरोप झाले होते. त्यांना या प्रकरणी टाडादेखील लागला होता. दाऊद इब्राहिमचा मेव्हुणा इब्राहिम कसकरची हत्या करणार्‍या अरुण गवळी गँगमधील शूटर शैलेश हळदणकर आणि विबीन यांची हत्या करणार्‍या शार्पशूटर्सना आश्रय दिल्याचाही बृजभूषण यांच्यावर आरोप होता. मात्र, सीबीआय तपासात बृजभूषण यांना क्लीन चिट देण्यात आली.

निवडणूक शपथपत्रात बृजभूषण यांच्यावर चार गुन्हे

बृजभूषण यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्यावर 4 गुन्हे नोंद आहेत, मात्र यातील एकाही गुन्ह्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. या चार गुन्ह्यांपैकी एक गुन्हा हा अयोध्येतील बाबरी विवादीत ढाचा पाडण्यासंबंधातील गुन्हा आहे.

दुसरा गुन्हा हा गोंडाच्या नवाबगंजमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातही त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. तिसरा गुन्हा हा राम जन्मभूमी अयोध्या पोलिस ठाण्यात सरकारी आदेशाचे पालन न करण्याचा आहे. एका सरकारी अधिकार्‍याला बंदी बनवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी अजून निर्णय झालेला नाही. बृजभूषण हे खेळाडूला थप्पड मारल्याप्रकरणीही चर्चेत आले होते. रांचीमधील राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपदरम्यान बृजभूषण सिंह यांनी एका युवा पैलवानाला कानशिलात लगावली होती.

बृजभूषण 6 वेळा खासदार

बृजभूषण सिंह यांनी राम मनोहर लोहिया विश्वविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीपटू असलेल्या बृजभूषण सिंह यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकले. त्यानंतर त्यांनी 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघांतून निवडणूक जिंकली. त्यांनी भाजप आणि समाजवादी पक्षाकडूनही निवडणूक लढवली आहे. ते 2011 मध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले. त्यांचा तिसरा कार्यकाळ आता संपतो आहे.

आलिशान गाड्या, सोने अन् शेतीही नावावर

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. 2019 साली आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सिंह यांच्याकडे 10 कोटीहून अधिकची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 9 कोटी, 89 लाख 5 हजार 402 रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय सिंह यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. सिंह यांच्या पत्नीकडे 6 कोटी, 34 लाख, 44 हजार 541 रुपयांची संपत्ती आहे. पत्नीच्या नावावर दोन लक्झरी गाड्यादेखील आहेत.

सिंह यांच्याकडे एंडेवर, महिंद्रा स्कॉर्पिओ तर पत्नीकडे टोयोटा आणि फॉर्च्युनर कार आहे. सिंह यांच्याकडे 50 ग्रॅम सोने आणि पत्नीकडे 200 ग्रॅम सोने आहे. गाड्या आणि सोन्याशिवाय सिंह यांना शस्त्रे बाळगण्याचा शौक आहे. सिंह यांच्या नावावर 5 बंदुका आहेत, तर पत्नीच्या नावावर देखील काही शस्त्रे आहेत.

बृजभूषण सिंह यांच्याकडे 1 कोटीची शेती, 2 कोटींची नॉन अ‍ॅग्रीकल्चर जमीन, 25 लाखांची व्यावसायिक इमारत आणि 2 कोटींची रहिवाशी इमारत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बसपच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. तर रांची येथे झालेल्या 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी मंचावर एका कुस्तीपटूला कानाखाली मारली होती.

हेही वाचा;

Back to top button