Hockey WC 2023 : न्यूझीलंड, नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी संघांचे विजय | पुढारी

Hockey WC 2023 : न्यूझीलंड, नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी संघांचे विजय

राऊरकेला : वृत्तसंस्था ओडिशा येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंड, नेदरलँड, बेल्जियम आणि जर्मनी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. (Hockey WC)

न्यूझीलंडला नवख्या चिलीने झुंजवले

राऊरकेला येथील सी गटातील सामन्यात न्यूझीलंडने आपला पहिला विश्वचषक खेळणार्‍या चिली संघाला 3-1 ने हरवले. न्यूझीलंडसाठी लेन सॅमने एक तर हीहा सॅमने दोन गोल केले. चिलीचा एकमेव गोल कोनाटार्डो इग्नासियोने केला. चिलीकडून विश्वचषकात पहिला गोल नोंदवण्याचा बहुमान त्याला मिळाला.

जर्मनीकडून जपानचा धुव्वा

ब गटात जर्मनीने जपानला 3-0 ने हरवून आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ केला. तथापि, जपानने त्यांना विजयासाठी चांगलेच झुंजवले. जर्मनीसाठी पहिला गोल 35 व्या मिनिटाला ग्रँबुश मॅशने पेनल्टी कॉर्नरवरून केला. रुहर ख्रिस्तोफरने 40 व्या मिनिटाला संघाची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर 48 व्या मिनिटाला प्रिंज थीस याने जर्मनीसाठी तिसरा गोल केला.

नेदरलँडचे मलेशियावर 4 गोल

शनिवारी सी गटातील दुसर्‍या सामन्यात नेदरलँड आणि मलेशिया हे दोन संघ आमने-सामने होते. यात तृतीय मानांकन असलेल्या नेदरलँडने 4-0 ने बाजी मारली. नेदरलँडकडून वॅन डॅम थीस (19वे मिनिट), जान्सेन जिप (23 वे मिनिट), बिंस ट्युन (46 वे मिनिट) आणि क्रून जॉरिट (59 वे मिनिट) यांनी गोल केले. या विजयाने नेदरलँड सी गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे आणि न्यूझीलंडचे समान तीन गुण असले तरी गोल फरकाच्या जोरावर नेदरलँड पुढे आहे. चिली तिसर्‍या तर मलेशिया चौथ्या स्थानावर आहेत.

बेल्जियमचा मोठा विजय

माजी विश्वविजेता बेल्जियमने ब गटातील आपल्या सामन्यात दक्षिण कोरियावर 5-0 ने विजय मिळवला. बेल्जियमसाठी हैंड्रिक्स अ‍ॅलेक्झांडर (30 वे मिनिट), कोसिंस टँगुई (42वे मिनिट), वॉन ऑबेल प्लोरेंटने (49 वे मिनिट), डॉकियर सेबस्टियन (51 वे मिनिट) आणि डी स्लूवर आर्थुर (57 वे मिनिट) यांनी गोल केले. या सामन्यावर बेल्जियमचे पूर्ण वर्चस्व होते. कोरियन संघाचा प्रतिकार कोठेच दिसला नाही.

हेही वाचा; 

Back to top button