

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ T20 : न्यूझीलंडने भारत दौऱ्यासाठी आपला टी-20 संघ जाहीर केला आहे. मिचेल सँटनरकडे कर्णधारपदाची जबाबदारी दोपवण्यात आली आहे. निवड समितीने बेन लिस्टर आणि हेन्री शिपले या दोन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यासोबतच अनेक अनुभवी खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 27 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर याआधी एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. दरम्यान, भारताविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी किवी संघाने आपला नियमित कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीला विश्रांती दिली आहे. या दोघांना विश्रांती देण्याचा निर्णय फार पूर्वीच घेण्यात आला होता. तथापि, हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त राहिल्यास ते 18 जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या वनडे संघाचा भाग असतील. (IND vs NZ T20)
लिस्टर आणि शिपले यांनी देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. याच कारणामुळे दोघांचा भारत दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. शिपलेने देशांतर्गत टी-20 स्पर्धेत 33 सामन्यांत 28 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच त्याने 20 डावात 298 धावा केल्या आहेत. नाबाद 39 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्टरबद्दल चर्चा करायची झाल्यास त्याने 39 सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 21 धावांत 3 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपले, इश सोधी, ब्लेअर टिकनर
पहिला टी 20 सामना – 27 जानेवारी (रांची)
दुसरा टी 20 सामना – 29 जानेवारी (लखनौ)
तिसरा टी 20 सामना – 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)