Rahul Dravid : टीम इंडियाला धक्का, प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रकृती बिघडली; चेकअपसाठी बंगळूरला रवाना | पुढारी

Rahul Dravid : टीम इंडियाला धक्का, प्रशिक्षक राहुल द्रविड यांची प्रकृती बिघडली; चेकअपसाठी बंगळूरला रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Dravid : श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या आणि शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची प्रकृती अचानक बिघडली असून ते शुक्रवारी सकाळी तिरुअनंतपुरमला न जाता थेट बंगळूरला रवाना झाले आहेत.

भारतीय संघाने गुरुवारी दुस-या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. आता शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये रविवारी (15 जानेवारी) होणार आहे. मात्र, त्याआधीच संघाचे मुख्य प्रशिक्षक द्रवीड (Rahul Dravid) यांची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. कोलकाता येथील दुस-या वनडे सामन्यादरम्यान त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांकडे तपासणी केली.

द्रविड (Rahul Dravid) यांची तब्येत पूर्णपणे बरी असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. रविवारच्या सामन्यापूर्वी शनिवारी तिरुअनंतपुरममध्ये ते संघात सामील होऊ शकतात, अशीही बातमी आहे. बंगळूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये द्रविड यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक, जे 11 जानेवारी रोजी 50 वर्षांचे झाले, ते त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आणि काही सावधगिरीच्या चाचण्या करण्यासाठी बंगळूरला गेले असल्याचीही चर्चा रंगली आहे.

Back to top button