David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरने दिले निवृत्तीचे संकेत, ‘या’ दिवशी घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप | पुढारी

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरने दिले निवृत्तीचे संकेत, ‘या’ दिवशी घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner Retirement : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठे वक्तव्य केले असून त्याने निवृत्तीचे संकेत दिले आहे. जर निवड समितीने माझ्यावर विश्वास ठेवला तर, 2024 ची टी-20 विश्वचषक स्पर्धा ही माझी शेवटची मोठी स्पर्धा असू शकते, असे त्याने स्पष्ट केले आहे.

वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसह इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम नोंदवले आहेत. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान, ‘हे माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे शेवटचे वर्ष असू शकते,’ असा खुलासा करत ‘2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर माझी नजर आहे. अमेरिका खंडात होणा-या या स्पर्धेचे ऑस्ट्रेलिया संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी जीवाचे रान करीन. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा निवड समिती माझ्यावर विश्वास ठेवेल,’ असेही त्याने स्पष्ट केले. (David Warner Retirement)

वॉर्नर सध्या 36 वर्षांचा आहे आणि तो तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी शानदार कामगिरी करत आहे. तो यंदाच्या वनडे विश्वचषक आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी ऑस्ट्रेलियासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरेल. युएईमध्ये 2021 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये डेव्हिड वॉर्नरने 7 डावात 146.7 च्या स्ट्राईक रेटने 289 धावा केल्या होत्या. त्याला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. त्याच्या या कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलिया विजेतेपदावर मोहोर उमटवण्यात यशस्वी ठरला होता. सध्या वॉर्नर बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सकडून खेळत आहे. (David Warner Retirement)

वॉर्नरने मात्र इंडियन प्रीमियर लीग खेळणार की नाही याबाबत काहीही सांगितले नाही. तो सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत 2023 च्या आयपीएल हंगामासाठी त्याला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही मिळू शकते. (David Warner Retirement)

त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 101 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 46.2 च्या सरासरीने आणि 71.38 च्या स्ट्राइक रेटने 8132 धावा जमवल्या आहेत. तसेच 141 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने आणि 95.26 च्या स्ट्राइक रेटने 6007 तर 99 टी-20 सामन्यांमध्ये 32.89 च्या सरासरीने आणि 141.31 च्या स्ट्राइक रेटने 2894 धावा केल्या आहेत.

Back to top button