मुंबईत ‘साखळी बॉम्बस्‍फोटां’ची धमकी देणाऱ्याला ‘एटीएस’कडून अटक | पुढारी

मुंबईत 'साखळी बॉम्बस्‍फोटां'ची धमकी देणाऱ्याला 'एटीएस'कडून अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी १९९३ सारखा साखळी बॉम्‍बस्‍फोट आणि दोन महिन्यानंतर दंगली होणार आहेत, असा कॉल करणाऱ्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत.

‘एटीएस’ने दिलेल्या माहितीनुसार, ०७ जानेवारी रोजी एका व्यक्तीने मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १०० नंबर हेल्पलाईनवर कॉल केला.  तो म्‍हणाला, ” १९९३ मध्‍ये जसा बॉम्बब्लास्ट झाला तसा बॉम्बब्लास्ट २ महिन्यानंतर माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी होणार आहे. तसेच मुंबईमध्ये १९९३ सालासारख्या दंगलीही उसळणार आहेत. यासाठी बाहेरच्या राज्यातुन लोकांना बॉम्बब्लास्ट व दंगली करण्यासाठी बोलविले आहे.”

मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दहशतवाद विरोधी पथकाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानुसार या कॉलच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाने ०२ पथके तयार करून तपासासाठी रवाना करण्यात आली होती. नियंत्रण कक्षाला आलेल्या कॉलच्या अनुषंगाने कॉल करणाऱ्या नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला (५५) याला मालाड रेल्वे स्टेशन परिसरातून शोधून काढले.

खानकडे केलेल्या चौकशीत त्याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल केल्याची कबुली दिली आहे. नबी याहया खानविरोधात मुंबईमध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल आहे. २०२१ मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे मार्फत तडीपार करण्यात आले होते. त्‍याच्‍याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button