

मुंबई, वृत्तसंस्था : श्रीलंकेविरुद्धच्या यशस्वी मालिका विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आता अधिक वाढला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला माहीत आहे की, टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला असला तरी न्यूझीलंड संघाला साधारण समजून चालणार नाही. कोणीही संघातील स्थान गृहित धरू नये, खेळपट्टी पाहूनच अंतिम संघ निवडला जाईल, असे रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनबाबत म्हणाला.
आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ही विश्वचषक स्पर्धा भारतातच खेळवली जाणार आहे. श्रीलंकेला 3-0 अशा गुण फरकाने हरवून भारताने 2023 ची दमदार सुरुवात केली, तीच लय टीम इंडिया न्यूझीलंडसमोर कायम ठेवू इच्छित आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना 317 धावांनी जिंकला, जो एक ऐतिहासिक विजय होता. कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय होता. आता भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघ पाकिस्तानला हरवून भारतात येत आहे, तो एक मजबूत संघ आहे. न्यूझीलंडला हरवणे सोपे नसेल. त्यांना अजिबात कमी लेखून चालणार नाही.
खेळपट्टी पाहिल्यानंतर प्लेईंग इलेव्हन ठरवू
पहिल्या एकदिवसीय सामन्याबाबत रोहित शर्मा याने सांगितले की, लोकेश राहुल आणि अक्षर पटेल यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे, दोघेही लग्न करणार आहेत. हे दोन्ही खेळाडू संघाचा महत्त्वाचा भाग आहेत, पण त्यांच्या जागेवर कोण खेळणार हे अजून ठरलेले नाही. खेळपट्टी पाहिल्यानंतर तो त्याच्या अंतिम अकराच्या संघाचे नियोजन करण्यात येईल. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारताचा संघ नेमका कोणता असेल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिकेचे वेळापत्रक
पहिला वन-डे – बुधवार, दि. 18 जानेवारी
दुसरा वन-डे – शनिवार, दि. 21 जानेवारी
तिसरा वन-डे – मंगळवार, दि. 24 जानेवारी
(सर्व सामने दुपारी 1.30 वा. सुरू होतील)
हेही वाचा…