पुणे, पुढारी वृत्तसेवा: 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माती विभागातील अंतिम लढतीमध्ये सिंकदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या लढतीदरम्यान पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन टिका होत आहे. तर दुसर्या बाजुला मुंबई पोलिस दलातील शिपायाने स्पर्धेतील पंच मारुती सातव यांनाच फोनवरुन थेट धमकी दिल्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. दरम्यान, आयोजन समितीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्र केसरीत सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोन वरून कुस्ती स्पर्धेतील पंच यांना धमकी दिली. याचे फोन रेकॉर्डिंग देखील समोर आले आहे. संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचा कुस्तीतील पंच मारुती सातव यांना फोन करून लाज काढली. धमकी नंतर पंच मारूती सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीचा अर्ज आल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा समितीकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्याही नावाचा उल्लेख संबंधित शिपाई संग्राम कांबळे यांनी केला आहे.
याबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मारुती सातव आणि दिनेश गुंड यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजन समितीकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत आयोजन समितीने कोथरुड आणि विमाननगर या दोन्ही पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला असून संबंधित संग्राम कांबळेवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला होता. महेंद्र गायकवाडने दुसर्या फेरीत 4 गुण मिळवत सिकंदर शेखवर 5-4 अशी आघाडी घेतली पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थीत झाला नव्हता. मग महेंद्रला चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. याचा जाभ विचारण्यासाठी संग्राम कांबळे यांनी थेट पंच मारुती सातव यांना धमकी दिली.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंच मारुती सातव आणि दिनेश गुंड यांना धमकी देणारी क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यासंदर्भात दोघांचेही अर्ज आयोजन समितीकडे प्राप्त झाले असून त्याअनुषंगाने कोथरुड आणि विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. संबंधित पोलिस शिपाईवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.
– पै. संदिप भोंडवे (आयोजन समिती प्रमुख, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा)