U-19 Womens T20 WC : भारताचा युएईवर 122 धावांनी दणदणीत विजय | पुढारी

U-19 Womens T20 WC : भारताचा युएईवर 122 धावांनी दणदणीत विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : U-19 Womens T20 WC : टीम इंडियाच्या अंडर-19 महिला संघाने संयुक्त अरब अमिरातीचा 122 धावांनी पराभव करत विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयास टीम इंडियाने सुपर 6 फेरीत प्रवेश मिळवला आहे. कर्णधार शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत या दोघींची जोडी पुन्हा एकदा संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाच्या सलामीवीर श्वेता सेहरावत (74*) आणि शेफाली वर्मा (78) यांनी धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि युएईच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली. दोघींनी 8.3 षटकांत पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भक्कम भागिदारी रचून भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग सोप्पा केला. शेफालीने केवळ 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर 34 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 78 धावा करून ती बाद झाली. त्यानंतर नंबर तीनवर आलेल्या ऋचा घोषनेही आपल्या बॅटची धमक दाखवली. तिने 49 धावा फटकावल्या आणि श्वेतासह 89 धावांची भागिदारी केली. या महत्त्वपूर्ण भागिदारीमुळे टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा गाठण्यात यश आले. 18.1 व्या षटकात ऋचा बाद झाली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गोंगडी तृषाने झटपट 5 चेंडूत 11 धावा तडकावल्या. पण ती 19.1 व्या षटकात बाद झाली. यावेळी संघाची धावसंख्या 214 झाली होती. शेवटच्या शिल्लक चेंडूंवर पाच धावा काढून टीम इंडियाने 219 धावांपर्यंत मजल मारली. श्वेताने 49 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 74 धावा केल्या. याचबरोबर प्रतिस्पर्धी युएईसमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले. (U-19 Womens T20 WC)

प्रत्युत्तरात यूएई संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय गोलंदाजीपुढे त्यांच्या फलंदाजीचा टीकाव लागला नाही. परिणामी यूएईच्या तीन विकेट 8.2 व्या षटकांत 40 धावात पडल्या. त्यानंतर लावण्य केणी आणि महिका गौर यांनी संयमी फलंदाजी केली. दोघींनी पुढची आठ षटके खेळत मैदानावत टीकून राहिल्या. पण या दरम्यान त्यांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धावा करू दिल्या नाहीत. अखेर ही जोडी 76 धावांवर फुटली. गौर (26) धाव बाद होऊन तंबूत परतली. दोघींमध्ये 36 धावांची भागिदारी केली. त्यानंतर उरलेली षटके खेळून काढण्यात युएईच्या फलंदाजांनी धन्यता मानली. पण शेवटच्या षटकात केणी (24) बाद झाली आणि त्यांचा संपूर्ण संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करू शकला. (U-19 Womens T20 WC)

भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

या सामन्यात शानदार फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले. यात साधू हिने 4 षटकांत 14 धावा देऊन 1 विकेट घेतली. शबनमने 3 षटकांत 21 धावांत 1 बळी मिळवला. मन्नत कश्यपने 3 षटकांत 14 धावांत 1 आणि पार्श्वी चोप्राने 3 षटकांत 13 धावांत एका फलंदाजाला माघारी धाडले.

Back to top button