पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना गमावला असला तरी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) या पराभवाने खचलेले नाहीत. उलट ते फिरकी अष्टपैलू खेळाडूंवर खूश आहेत. या विभागात संघ खूप मजबूत असून याची आणखी ताकद वाढण्यासाठी रवींद्र जडेजा लवकरच संघात येईल, असे संकेत द्रविड यांनी दिले. तसेच युवा खेळाडूंसोबत संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
द्रविड (Rahul Dravid) म्हणाले, भारताने आतापर्यंतच्या दोन टी-20 सामन्यांत गिल, मावी आणि त्रिपाठी या तीन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. आम्हाला या युवा खेळाडूंबाबत संयम बाळगावा लागेल. पराभवासाठी युवा खेळाडूंना जबाबदार धरू नये. या संघात अनेक युवा खेळाडू खेळत आहेत. असे सामने होऊ शकतात हे समजून घेतले पाहिजे. युवा खेळाडू सुधारणा करत आहेत पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अटीतटीच्या सामन्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव आहे, असे मत व्यक्त केले.
पुण्यातील टी 20 सामन्यात अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावा करत दोन विकेट घेतल्या. जेव्हा-जेव्हा अक्षरला टी-20 सामन्यात संधी मिळाली तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. हे एक चांगले लक्षण आहे. त्याच्यामुळे आपच्याकडे पर्याय वाढले आहेत. रविंद्र जडेजाही येईल. वॉशिंग्टन सुंदर हाही चांगला पर्याय आहे. या खेळाडूंच्या कामगिरीने आम्ही आनंदी आहोत, अशी भावनाही द्रविड (Rahul Dravid) यांनी बोलून दाखवली.
शिवम मावीच्या वेगवान गोलंदाजीच्या कामगिरीवर कर्णधार हार्दिक पंड्या खूप खूश असल्याचेही प्रशिक्षक द्रविड यांनी सांगितले. या सामन्यात मावीने फलंदाजीदरम्यान जलद 26 धावा केल्या. द्रविड म्हणाले, वेगवान गोलंदाजीमध्ये आम्ही हार्दिकवर खूप अवलंबून आहोत. इतर खेळाडूंनीही पुढे यावे, अशी आमची इच्छा आहे. मावीची फलंदाजी पाहून आनंद झाला, त्याने कर्णधाराच्या चेहऱ्यावर हसू आणले. वेगवान गोलंदाजांने केलेली अशी आक्रमक फलंदाजी पाहून समाधान वाटले.