Shoaib Akhtar vs Umran Malik: ‘उमरान तू रेकॉर्ड तोड, पण हाडं मोडून घेऊ नकोस’; शोएब अख्तरचा सल्ला | पुढारी

Shoaib Akhtar vs Umran Malik: ‘उमरान तू रेकॉर्ड तोड, पण हाडं मोडून घेऊ नकोस’; शोएब अख्तरचा सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Akhtar Akhtar vs Umran Malik : टीम इंडियाचा गोलंदाज उमरान मलिकने श्रीलंकेविरुद्ध 155 किमी प्रतितास वेगाने केलेल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. क्रिकेट वर्तुळातून त्याच्या या वेगवान गोलंदाजीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही विधान केले आहे. ‘उमरानने माझा विक्रम मोडला तर मला आनंदच होईल. पण माझे रेकॉर्ड तोडताना त्याची हाडे मोडू नयेत. म्हणजे तो तंदुरुस्त असावा,’ असा सल्ला दिला आहे.

उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने कहर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत दासुन शनाकाची विकेट घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले. या सामन्यानंतर उमरानने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही विक्रम मोडण्याची डरकाळी फोडली. (Shoaib Akhtar vs Umran Malik)

दरम्यान, क्रीडा वाहिनीवरील संभाषणादरम्यान अख्तरला उमरानच्या हेतूबद्दल महत्त्वाकांक्षी विधानावर प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी अख्तरने उमरानला सल्ला दिला. अख्तरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम आहे. 2003 च्या विश्वचषकादरम्यान अख्तरने इंग्लंडविरुद्ध 161.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात उमरानने नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्याने 4 षटकांच्या गोलंदाजीत केवळ 27 धावा देत 2 बळी घेतले होते. हा सामना संपल्यानंतर उमरानला शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘सध्या मी फक्त देशासाठी चांगला खेळ करण्याचा विचार करत आहे. जर मी चांगली कामगिरी केली आणि मी नशीबवान असलो तर मी नक्कीच सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम मोडीन. पण मी त्याबद्दल अजिबात विचार करत नाही. तुम्ही सामन्यादरम्यान किती वेगवान गोलंदाजी केली होती हे तुम्हाला त्यावेळी समजत नाही. सामना संपल्यानंतर जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये येतो तेव्हा आम्हाला कळते की आम्ही किती वेगाने गोलंदाजी केली आहे. सामन्यादरम्यान माझे लक्ष फक्त योग्य लयीत गोलंदाजी करणे आणि विकेट्स घेणे हेच असते.’ (Shoaib Akhtar vs Umran Malik)

उमरान मलिकने 2022 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याला इंग्लंडमध्ये टी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये देखील त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत उमरान मलिकचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. त्याने आतापर्यंत 5 एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्स आणि 4 टी-20 मध्ये 4 बळी घेतले आहेत.

Back to top button