Hockey WC 2023 : हॉकी वर्ल्डकप जिंका, 1 कोटी मिळवा! ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची टीम इंडियासाठी मोठी घोषणा | पुढारी

Hockey WC 2023 : हॉकी वर्ल्डकप जिंका, 1 कोटी मिळवा! ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची टीम इंडियासाठी मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hockey WC 2023 : भारतीय हॉकी संघाने विश्वचषक जिंकल्यास संघातील सर्व खेळाडूंना एक-एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी केली. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये वर्ल्ड कप व्हिलेजच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वर्ल्ड कप व्हिलेज नऊ महिन्यांच्या विक्रमी वेळेत बांधले गेले आहे आणि हॉकी वर्ल्ड कपच्या स्तरावर सर्व सुविधांसह 225 खोल्या आहेत. हॉकी विश्वचषक संघ आणि अधिकारी वर्ल्ड कप व्हिलेजमध्ये राहतील.

पुरुष हॉकी विश्वचषक 2023 (Hockey WC 2023) भारतातील ओडिशा येथे होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने भुवनेश्वर आणि राउरकेला येथे 13 ते 29 जानेवारी या कालावधीत खेळले जातील. भारत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाचे सर्व सामने ओडिशामध्ये होतील. यंदाच्या स्पर्धेत 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारताने 48 वर्षांपूर्वी 1975 मध्ये पहिला आणि शेवटचा विश्वचषक जिंकला होता.

मुख्यमंत्री पटनायक यांनी वर्ल्ड कप व्हिलेज (Hockey WC 2023) येथे वास्तव्यास असलेल्या राष्ट्रीय पुरुष हॉकी संघाशी संवाद साधला. ‘टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यास संघाच्या प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. मी टीम इंडियाला शुभेच्छा देतो आणि आशा करतो की ते चॅम्पियन म्हणून उदयास येतील,’ असा विश्वास पटनायक यांनी व्यक्य केला.

खेळाडूंनी ओडिशा सरकारचे कौतुक केले. देशातील खेळाडू आणि हॉकीसाठी चांगल्या सुविधा आणि वातावरण निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. वर्ल्डकप व्हिलेजमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना स्पर्धेसाठी चांगले वातावरण मिळाल्याची भावना व्यक्ती केली.

Back to top button