‘Delhi Capitals’च्या कर्णधार पदासाठी कांगारूच्या ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत | पुढारी

‘Delhi Capitals’च्या कर्णधार पदासाठी कांगारूच्या ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : Delhi Capitals : कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला क्रिकेटच्या मैदानापासून पुढील बराच काळ दूर रहावे लागणार आहे. त्याची सध्याची प्रकृती पाहता तो आयपीएल 2023 मधून बाहेर राहिल असे मानले जात आहे. अशातच पंत हा ज्या आयपीएल फ्रँचायझीचा कर्णधार आणि यष्टीरक्षक आहे त्या दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पंतच्या रिप्लेसमेंटबाबत आतापासून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आयपीएल 2021 मध्ये पंतला दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार बनवण्यात आले होते. दरम्यान, पंतची सध्याची अवस्था पाहता दिल्ली फ्रँचायझी संघाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पुढे येत आहे. यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे कर्णधार पदासाठी नाव आघाडीवर आहे. त्याने आयपीएलमध्ये हैदराबाद फ्रँचायझीचे नेतृत्व केले आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझी 2016 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनली होती. दुसरीकडे, यष्टीरक्षणाची जबाबदारी सरफराज खानकडे दिली जाऊ शकते, असे समजते आहे.

रिपोर्टनुसार, दिल्लीकडे (Delhi Capitals) इंग्लिश फिल सॉल्टच्या रूपात यष्टीरक्षकाचा पर्याय उपलब्ध असला तरी ही जबाबदारी परदेशी खेळाडूला दिल्याने संघाचा समतोल बिघडू शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. यष्टिरक्षक म्हणून सॉल्टला संधी दिली तर भारतीय वेगवान गोलंदाजांचे त्याच्यावरचे अवलंबित्व वाढेल. कारण अशा परिस्थितीत अॅनरिक नोर्किया आणि मुस्तफिझूर रहमान यांच्यापैकी एकाला बेंचवर बसावे लागेल. मिचेल मार्शच्या रूपाने दिल्ली संघाला एक उत्तम अष्टपैलू पर्याय मिळाला आहे. त्यामुळे त्याला बाहेर बसवणे शक्य नाही. रोव्हमन पॉवेलने आयपीएलच्या शेवटच्या मोसमात चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला बेंचवर ठेवणे योग्य होणार नाही. अशा परिस्थितीत मुंबईच्या सरफराज खानला यष्टिरक्षक बनवण्याशिवाय दिल्ली कॅपिटल्सकडे दुसरा पर्याय दिसत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Back to top button