Sanju Samson : संजू सॅमसन दुसऱ्या टी 20 सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता! कारण… | पुढारी

Sanju Samson : संजू सॅमसन दुसऱ्या टी 20 सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता! कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanju Samson : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचा दुसरा सामना गुरुवारी पुण्यात होणार आहे. दोन्ही संघ पुण्यात पोहोचले आहेत. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू असतील आणि कोणाला डावलले जाईल, याबाबत रणनीती आखली जात आहे. अशातच टीम इंडियाच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. संजू सॅमसन दुसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. संजूला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली होती. कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले, पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याच वेळी, श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाल्यावर पहिल्या षटकातच संजूने एक झेलही सोडला. पण त्यानंतर त्याने दोन झेल घेतले आणि खराब कामगिरीची भरपाई केली.

संजू सॅमसनच्या गुडघ्याला दुखापत (Sanju Samson)

संजू सॅमसन (Sanju Samson) दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर राहू शकतो. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार संजू सॅमसन टीमसोबत पुण्यात पोहोचला नसल्याचे समजते आहे. संजूच्या गुडघ्याला दुखापत झाली असून गुडघ्याच्या स्कॅनिंगसाठी तो अजूनही मुंबईत थांबला आहे. हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकात झेल टिपण्यासाठी त्याने डायव्ह टाकला त्याच वेळी ही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने चेंडू पकडलाही होता, पण तो जमिनीवर पडला, त्याचवेळी चेंडू हाताबाहेर गेला आणि झेलही निसटला. यानंतर तो मैदानावर राहिला आणि क्षेत्ररक्षण करतानाही दिसला. दुखापत फारशी गंभीर नसली तरी स्कॅन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. सामना संपला तेव्हा त्याच्या गुडघ्याला सूज आली होती, असेही समजते आहे.

संजू न खेळल्यास राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्याता

संजू सॅमसन (Sanju Samson) दुसऱ्या टी-20 सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, दुखापत फारशी गंभीर नसेल तर तिसऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकतो. मात्र आत्ताच काही निश्चितपणे सांगता येणार नाही. संजू बाहेर पदल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुलला अनेकवेळा भारतीय संघात सामील करण्यात आले आहे, मात्र त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिल आणि शिवम मावी यांनी पदार्पण केले होते, आता आणखी एक खेळाडू पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान, संजू सॅमसनसाठी बीसीसीआयकडून काही अपडेट्सची प्रतीक्षा करावी लागेल.

Back to top button