AUS vs SA Test : सिडनी कसोटीत तिस-या पंचांनी निर्णय उलटवला, मोठा वाद पेटला (Video) | पुढारी

AUS vs SA Test : सिडनी कसोटीत तिस-या पंचांनी निर्णय उलटवला, मोठा वाद पेटला (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs SA Test : मार्नस लॅबुशेन (79) आणि उस्मान ख्वाजाच्या (नाबाद 51) अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटीत दमदार सुरुवात केली. मात्र, खराब हवामानामुळे प्रभावित झालेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी कांगारूंना 2 बाद 147 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी, यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. मागच्या सामन्यात द्विशतक झळकावणारा वॉर्नर 11 चेंडूत 10 धावा माघारी परतला. यावेळी कांगांरूंची धावसंख्या 12 होती. त्यानंतर ख्वाजा आणि लबुशेन यांनी डाव सांभाळला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. पण दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर लाबुशेन बाद झाला. नोर्कियाने (26 धावांत 2 बळी) यष्टिरक्षक काइल व्हेरेन करवी त्याला झेलबाद करून मैदान सोडता-सोडता दुसरा धक्का दिला. पहिल्या दिवशी तीन तासांहून अधिकचा वेळ खराब हवामानामुळे न खेळताच वाया गेला.

खेळाच्या पहिल्या दिवशी थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद

खराब प्रकाशामुळे खेळ थांबण्यापूर्वीच मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. तिसर्‍या पंचांनी मैदानात झेल घेण्याच्या अपीलचा मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 40व्या षटकात, द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेनने फुल लेन्थ स्विंग चेंडू टाकला जो लॅबुशेनच्या बॅटची कड घेऊन स्लिपमधील क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. बॉल जमिनीपासून थोडा वर पकडल्यासारखा दिसत होता. आफ्रिकन संघातील सर्व खेळाडूंनी आवाहन केले. मैदानावरील पंच पॉल रायफल यांनी बाद असल्याचा निर्णय दिला ज्याचा टीव्ही पंचांनी आढावा घेतला. व्हिडीओ आणि रिप्ले पाहिल्यानंतर टीव्ही पंचांनी मैदानावरील पंचाचा निर्णय उलटवला. तिसर्‍या पंचाचे मत होते की, क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत चेंडू जाण्यापूर्वीच जमिनीवर आदळल्याचे पुरेसे पुरावे आहेत. या निर्णयाने द. आफ्रिकेचे सर्व खेळाडू चकित झाले. (AUS vs SA Test)

उस्मान ख्वाजाच्या 4000 धावा पूर्ण

ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली. त्याने दमदार खेळी करत कसोटी कारकिर्दीतील 20 वे अर्धशतक फटकावले. यासह ख्वाजा कसोटीत 4000 धावाही पूर्ण केल्या. 56 व्या कसोटीत त्याने हा पल्ला गाठला असून अशी कामगिरी करणारा तो 27 वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. ख्वाजाची कसोटीत फलंदाजीची सरासरी 45 पेक्षा जास्त आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून 12 शतके झळकावली आहेत. तर 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 84.09 च्या स्ट्राइक रेटने 1554 धावा केल्या आहेत. तसेच टी-20 चे 9 सामने खेळले असून ज्यात त्याने 241 धावा केल्या आहेत. (AUS vs SA Test)

Back to top button