IND vs SL T20 : हुडा-अक्षरने मोडला धोनी-पठाण जोडीचा 13 वर्ष जुना विक्रम! | पुढारी

IND vs SL T20 : हुडा-अक्षरने मोडला धोनी-पठाण जोडीचा 13 वर्ष जुना विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ind vs sl t20 : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अवघ्या दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. पदार्पण सामना खेळणारा शिवम मावी आणि जम्मू एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा उमरान मलिक यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण या विजयाचा पाया रचण्याचे श्रेय दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांना जाते. टीम इंडियाने 14.1 षटकात पाच विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या फक्त 94 होती. यानंतर हुडा आणि अक्षर यांनी मिळून भारताची धावसंख्या पाच बाद 162 पर्यंत नेले. दोघांनी मिळून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आणि आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवले. या दोघांच्या जोडीने 13 वर्षांपूर्वीचा महेंद्रसिंग धोनी आणि युसूफ पठाण यांचा विक्रमही मोडीत काढला.

हुडा आणि अक्षर या जोडीने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सामन्यांत सहाव्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी रचली. याचबरोबर ते भारतासाठी सर्वात मोठ्या भागीदारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सहव्या विकेटसाठी सर्वोच्च भागिदारी करण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याची जोडी आहे, ज्यांनी मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 70 धावांची भागीदारी केली होती. तर धोनी आणि पठाण यांची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी 2009 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध नाबाद 63 धावांची भागीदारी केली होती. (ind vs sl t20)

तसेच हुडा-अक्षर जोडी भारताकडून सहाव्या विकेटसाठी टी-20 मधील सर्वात मोठ्या नाबाद भागीदारीच्या बाबतीत नंबर-1 बनली आहे. या सामन्यात हुडाने 23 चेंडूत नाबाद 41 तर अक्षर पटेलने 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने 20 षटकात 5 गडी गमावत 162 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकात 160 धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारीला होणार आहे. (ind vs sl t20)

Back to top button