Rehan Ahmed : इंग्लंडचा रेहान ठरला पदार्पणात 5 विकेट घेणारा सर्वात युवा गोलंदाज | पुढारी

Rehan Ahmed : इंग्लंडचा रेहान ठरला पदार्पणात 5 विकेट घेणारा सर्वात युवा गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा लेग-स्पिनर रेहान अहमदने (Rehan Ahmed) त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत कसोटीत पाच बळी घेणारा तो सर्वात तरुण पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. 18 वर्षे आणि 126 दिवसांच्या वयात कसोटी पदार्पण केल्यानंतर रेहानने दुसऱ्या डावात 48 धावांत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याचबरोबर त्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला 74.5 षटकांत 216 धावांवर ऑलआऊट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

रेहानने (Rehan Ahmed) ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा विक्रम मोडीत काढला आहे. कमिन्सने यापूर्वी 18 वर्षे 193 दिवसांच्या वयात कसोटी पदार्पणात करताना द. आफ्रिकेविरुद्ध 79 धावांत 6 बळी घेतले होते. त्याने 2011 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील 41 षटकांनंतर सोमवारी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने रेहानला गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला. या संधीचे सोने करत त्याने बाबर आझम आणि सौद शकील यांच्यातील भागीदारी मोडून यजमान संघावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. रेहानची (Rehan Ahmed) पहिली शिकार ठरली तो बाबर आझम (54). त्यानंतर त्याने रिझवानला (7) माघारी धाडत पाकच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

त्यानंतर रेहानने सौद शकीलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. शकील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वीप मारण्यासाठी सरसावला, पण त्याची ही चूक ठरली. जॅक लीचने त्याचा झेल पकडला. यानंतर मोहम्मद वसीमला मिडऑफमध्ये, आगा सलमानला शॉर्ट फाइन लेगवर झेल देण्यास भागपाडून दोघांच्या विकेट मिळवल्या.

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ब्रेकच्या वेळी रेहानच्या कराचीतील कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘रेहान विकेट-टेकिंग चेंडू टाकत असून हे एक चांगले लक्षण आहे. सामन्यात वर्चस्व राखण्यासाठी आणि काय हवे? रेहान हा नैसर्गिक विकेट घेणारा गोलंदाज असेल असे दिसते. कराची कसोटीचे पारडे हळूहळू पाकिस्तानकडे झुकत होते पण सामन्याच्या तिस-या दिवशी रेहाने बाजी पालटली आणि इंग्लंडने दमदार पुनरागमन केले.’

इंग्लंडसाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू (Rehan Ahmed)

रेहानने जानेवारी 2022 मध्ये इंग्लंडसाठी अंडर-19 विश्वचषक खेळला असून त्या स्पर्धेत त्याने 12 बळी घेत इंग्लंडला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण फायनलमध्ये त्यांना टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला होता. रेहान इंग्लंडकडून कसोटी खेळणारा सर्वात तरुण पुरुष क्रिकेटपटू ठरला. त्याने 73 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. आतापर्यंत, इंग्लंडसाठी सर्वात तरुण पदार्पण करणारा विक्रम ब्रायन क्लोज यांच्या नावावर होता. त्यांनी 1949 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 18 वर्षे वयाच्या 149 दिवस वय असताना कसोटी पदार्पण केले होते.

Back to top button