Angel Di Maria : ’30 फुटबॉल’मध्ये विक्री झालेल्या ‘या’ मुलाने मेस्सीला चमकवले!

Angel Di Maria : ’30 फुटबॉल’मध्ये विक्री झालेल्या ‘या’ मुलाने मेस्सीला चमकवले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Angel Di Maria : रोझारियो सेंट्रल क्लबच्या प्रशिक्षकांनी एका सात वर्षाच्या मुलाला स्थानिक स्पर्धेत खेळताना पाहिले आणि त्याला 30 फुटबॉलमध्ये विकत घेतले. अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये ही संस्कृती होती. तुम्ही मुलांना फुटबॉल देऊन तुमच्या क्लबसाठी साइन इन करू शकता. त्याच्या चार वर्षांपूर्वी, म्हणजे वयाच्या तिस-या वर्षी, एका डॉक्टरने या मुलाबद्दल भाकीत केले होते की, 'हा मुलगा खेळ खेळेल, तरच शांत होईल. तो खूप खेळकर आहे… त्याच्याकडे खूप ऊर्जा आहे. कराटे नाही तर, त्याने फुटबॉल खेळले पाहिजे.'

त्या मुलाच्या फुटबॉल स्टार बनण्याची कहाणी इथूनच सुरू झाली. त्याचे नाव आहे एंजल डी मारिया (Angel Di Maria). 10 वर्षांचा होता तोपर्यंत हा मुलगा कोळसा कारखान्यात काम करायचा. फुटबॉल खेळणेही सुरूच होते. 2005 मध्ये तो रोझारियो सेंट्रल क्लबमधून पदवीधर झाला आणि दोन वर्षे या क्लबसाठी खेळला. तिथून पुढे डी मारियाने थेट पोर्तुगाल गाठून बेनफिका क्लबसाठी करार केला.

अर्जेंटिनाबरोबरचा प्रवास कसा सुरू झाला?

2005 मध्ये डी मारियाने मेस्सीसोबत अंडर-20 विश्वचषक जिंकला होता. ही जोडी फुटबॉल विश्वात काहीतरी मोठं रणार असे भाकीत त्यावेळी अनेक विश्लेषकांनी केले होते. 2008 मध्ये, डी मारियाने अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघासाठी पदार्पण केले. 2008 च्या ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत डी मारियाने गोल केला आणि अर्जेंटिनाने नायजेरियाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. 2021 च्या कोपा अमेरिका कपचे विजेतेपद मिळवण्यातही त्याने मोलाची भूमिका बजावली. त्याच्या गोलच्या जोरावर मेस्सीला प्रतिष्ठेचा कप उंचावण्याची इछा पूर्ण झाली. पण त्यापूर्वी डी मारिया एका संधीचे सोने करता आले नव्हते ज्याचे शल्य त्याला गेली आठ वर्षे बोचत राहिले. 2014 फिफा विश्वचषक. अंतिम फेरीत अर्जेंटिनासमोर जर्मनीचे आव्हान होते. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी डी मारिया पायाच्या दुखापतीने त्रस्त होता. असे असूनही तो अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवण्यासाठी इंजेक्शन घेवून मैदानात उतरण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचा क्लब रिअल माद्रिदला हे नको होते आणि डी मारिया त्या अंतिम सामन्यात खेळला नाही. त्या सामन्यात अर्जेंटिनालाच्या संघाला जर्मनीने 1-0 ने मात देऊन जगज्जेता बनण्याचे मेस्सीचे स्वप्न धुळीस मिळवले.

डी मारिया (Angel Di Maria) असता तर संघ जिंकला असता असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण डि मारिया खेळला असता तर मोठा फरक पडला असता. विजय-पराजय समान पायावर उभे राहिले असते. यानंतर चार वर्षांनी रशियात खेळवल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्येही अर्जेंटिनाचे काही खास प्रदर्शन करता आले नाही आणि त्यांना एमबाप्पेच्या फ्रान्सने राऊंड ऑफ 16 मधून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले होते. या पराभवाची भळभळती जखम घेऊन ते 2021 च्या कोपा अमेरिका स्पर्धेत उतरले. मेस्सीच्या संघीने अंतिम फेरीत धडक मारली. आता शेवटचे आव्हान होते ते ब्राझीलचे. सामन्याच्या 22 व्या मिनिटाला डी मारियाने ब्राझीलचा गोलकीपर एडरसनला चकवत गोल केला. अर्जेंटिनाने 1-0 ही आघाडी कायम ठेवली आणि सामना खिशात घालून मेस्सीच्या कारकिर्दीतील पहिल्याच ट्रॉफीवर नाव कोरले. डि मारियामुळेच ते शक्य झाले होते.

आता 2022 च्या वर्ल्ड कप फायनची चर्चा करूया. अर्जेंटिनाने 23व्या मिनिटाला पहिला गोल केला. भले मेस्सीने हा गोल पेनल्टीवर केला असला तरी ती पेनल्टी कुणामुळे मिळाली? उत्तर आहे डी मारिया. दूसरा गोल कुणी केला? 36 व्या मिनिटाला डी मारियानेच फ्रान्सचे गोलजाळे भेदले आणि आपल्या संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली. सामन्यात सर्वाधिक संधी कोणी निर्माण केल्या? उत्तर आहे डी मारिया. 1986 नंतर अर्जेंटिनाची ही सुवर्ण पिढी आहे. मेस्सी हा जागतिक फुटबॉल आणि त्याच्या संघाचा गोल्डन बॉय असला तरी फुटबॉल आणि अर्जेंटिना संघाला फॉलो करणार्‍या चाहत्यांना माहित आहे की मेस्सीला चमकवणारा जौहरी हा डी मारिया आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news