Messi Big Record : ‘विक्रमादित्य मेस्सी’ने फायनलमध्ये केले ‘हे’ पराक्रम! | पुढारी

Messi Big Record : ‘विक्रमादित्य मेस्सी’ने फायनलमध्ये केले ‘हे’ पराक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Messi Big Record : फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या मेस्सीने मोठे विक्रम आपल्या नावावर केले. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 26 सामने खेळणारा तो खेळाडू बनला आहे. रविवारी रात्री फ्रान्सविरुद्धच्या महामुकाबल्यात मेस्सीने हा पराक्रम केला. त्याने 25 सामने खेळलेल्या माजी जर्मन दिग्गज लोथर मॅथॉसला मागे टाकले आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर्मनीचा मिरोस्लाव क्लोस आहे, ज्याने फिफा विश्वचषक स्पर्धेत जर्मनीकडून 24 सामने खेळले. इटलीच्या पाउलो मालदीनीने विश्वचषकातील 23 सामन्यांमध्ये भाग घेतला होता.

याचबरोबर फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात गोल करताच त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. तो विश्वचषकाच्या साखळी फेरी (8), राऊंड ऑफ 16 (1), क्वार्टर फायनल (1), सेमीफायनल (1) आणि फायनलमध्ये (3) गोल करणारा विश्वचषक इतिहासातील पहिला खेळाडू बनला. तसेच मेस्सीच्या नावावर आता 12 विश्वचषक गोलची नोंद झाली असून त्याने ब्राझीलचे माजी दिग्गज खेळाडू पेले (12) यांच्याशी बरोबरी केली आहे.

मेस्सीची जादू आणि अचूक पासने अर्जेंटिनाला दुहेरी यश (Messi Big Record)

35 वर्षीय मेस्सी शेवटचा विश्वचषक खेळत आहे. त्याच्या ड्रिब्लिंगचे सर्वांनाच वेड आहे. चेंडूवर नियंत्रण ठेवून तो विरोधी संघाला फसवतो. अंतिम सामन्यातही त्याची ही जादू पहायला मिळाली. अर्जेंटिनाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमण हाच बचाव ही रणनिती वापरून फ्रान्सच्या गोलपोस्ट धडका मारल्या. मेस्सीने अनेकवेळा फ्रेंच खेळाडूंना चकवा देत आपल्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंना अचूक पास दिले. पण, सामन्याच्या 20 मिनिटांपर्यंत त्यांच्या आक्रमणाला यश आले नाही. पण 21 व्या मिनिटाला केलेल्या एका चढाईदरम्यान, फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने पेनल्टी बॉक्समध्ये अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाला चूकीच्या पद्धतीने पाडले. ही चूक पाहून रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. मेस्सीने या संधीचे सोने करत फ्रेंच गोलरक्षका चकवत डाव्या कोप-यात चेंडू पाठवला. त्याने 23 व्या मिनिटाला गोल केला. याबरोबरच स्टेडियमध्ये एकच जल्लोष झाला. मेस्सीचा हा यंदाच्या विश्वचषकातील सहावा गोल असून तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.

1-0 असी आघाडी मिळाल्यानंतर अर्जेंटिनाने आपल्या आक्रमणाला आणखीन धार आणली. चेंडूवरचा ताबा सुटू न देता त्यांनी फ्रांन्सवर दबाव टाकला. त्यामुळे फेंच खेळाडू हतबल होताना दिसले. याचाच फायदा उठवत 36 व्या मिनिटाला मेस्सीने फ्रेंच मिडफिल्डरला फसवून मॅकअलिस्टरकडे चेंडू पास केला. पुढे मॅकअलिस्टरने डी मारियाकडे चेंडू पास केला आणि डी मारियाने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. या गोलमध्ये मेस्सीच्या सुरुवातीचा पास खूप महत्त्वाचा ठरला. एकप्रकारे त्याने टाकलेल्या ठिणगीचा पुढे जाऊन वणवा झाला आणि अर्जेंटिनाने पहिल्याच हाफमध्ये डबल धमाका करून 2-0 अशी अघाडी मिळवली.

Back to top button