Argentina Fans : फायनलसाठी मौल्यवान वस्तू विकून अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी गाठले कतार !

Argentina Fans : फायनलसाठी मौल्यवान वस्तू विकून अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी गाठले कतार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क: फुटबॉल वेडा देश अर्जेंटिना आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असूनही आपला देश 36 वर्षांनंतर विश्वचषक विजेता बनलेला पाहण्यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी स्वतः जवळच्या मौल्यवान वस्तू विकून कतार गाठले आहे. दोहाच्या रस्त्यांवर अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा उत्साह आणि जोश पाहायला मिळत आहे. हे चाहते संघाची पारंपरिक निळ्या-पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान करून ढोल, ड्रम, पावा वाजवत 'मुचाचोस' नावाचे गाणं गात खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एकप्रकारे हे गाणं जणू अर्जेंटिनाचे 'विश्वचषक राष्ट्रगीत'च बनले आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजता फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना फ्रान्सचे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या संघाचे नेतृत्व करत असलेल्या स्टार मेस्सीकडे अवघा जगाचे लक्ष लागले आहे. गोट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्टार खेळाडूला विजेतेपदाची ट्रॉफी उंचावताना सर्व चाहत्यांना डोळे भरून पाहायचे आहे.

कतारी राजधानीतील सौक वक्फ मार्केटच्या एका कोपऱ्यात फुटबॉलला लाथ मारताना अर्जेंटिनाच्या आकाशी निळ्या आणि पांढर्‍या पट्टेदार जर्सी घातलेल्या तरुणीच्या भोवती स्थानिक आणि पर्यटकांचा जमाव जमला. लुसेल स्टेडियमवर विश्वचषक फायनलसाठी तिकीटांची मागणी करणारा इंग्रजी आणि अरबी भाषेत हस्तलिखित बॅनर होता. बेलेन गोडोई या २४ वर्षीय चाहत्याने सांगितले, "फुटबॉल माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी माझ्या कुटुंबाला सोडून इथे आलो आहे. मी माझी सर्व बचत खर्च केली आहे. मी ब्युनोस आयर्सला परत जाणार आहे आणि मी माझे भाडे कसे भरणार आहे हे मला माहित नाही. पण मी जे आयुष्य जगले ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,' अशी भावना तिने बोलून दाखवली.

पुनर्विक्रीसाठी ठेवलेली तिकिटे विकत घेऊन गोडोई नावाच्या चाहत्याने अर्जेंटिनाचा जवळजवळ प्रत्येक सामना पाहिला आहे. अर्जेंटिनाचे अनेक चाहते आहेत ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू विकल्या आहेत. त्यापैकी 34 वर्षीय क्रिस्टियन मशिनेली आहे, ज्याने मेस्सीला वर्ल्ड कप विजेता कर्णधार म्हणून पाहण्यासाठी आपला टोयोटा ट्रक विकला आहे.

मशिनेली म्हणाला, 'आतापर्यंत मी येथे ट्रक विक्रीतील मिळालेली रक्कम खर्च केली असून अंतिम सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. आम्ही अर्जेंटिनाच्या फुटबॉलचे वेडे आहोत आणि आमच्या राष्ट्रीय संघाच्या खेळाडूंसाठी आम्ही काहीही करू शकतो.'

निकोलस नावाच्या एका चाहत्याने तर, माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी घरी कसे जाईन याची कल्पना नाही. मेस्सीला विश्वचषक जिंकताना पाहण्याचा क्षण अवर्णनीय असेल. आमच्या राजकारण्यांनी आम्हाला निराश केले आहे. पण आमच्या फुटबॉल संघाने तसे केले नाही, हे नायक आमच्यासाठी एकमेव आशा आहेत, अशी भावना व्यक्त केली आहे.

अर्जेंटिनाचे किती चाहते कतारमध्ये पोहोचले आहेत याची अधिकृत आकडेवारी नाही. मेस्सीच्या संघाला वर्ल्ड चॅम्पियन झालेलं पाहण्यासाठी हे वेडे फुटबॉलप्रेमी केवळ अर्जेंटिनातूनच नाही तर, युरोप आणि अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून चाहते कतारमध्ये पोहोचले आहेत.

अर्जेंटिनातील नागरिक महागाईने होरपळून निघत आहेत. तेथील चलनवाढीचा दर नोव्हेंबरमध्ये 92.40 टक्क्यांपर्यंत वाढून 2022 च्या ऑक्टोबरमध्ये 88 टक्के होता. या देशाचे नागरिक इतके गरीब आहेत की, त्यांना महिण्याकाठी 32 हजार रूपये कमावण्यासाठी दोन ते तीन नोकऱ्या करून दिवसाचे 16 तास राबावे लागते. देशाच्या लोकसंख्येपैकी दहापैकी चार लोक दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत. पण तरीही फुटबॉलच्या वेडापायी पैसे उधार घेऊन, बँकेचे कर्ज काढून चाहते आपल्या राष्ट्रीय संघातील नायकांचे मनोबल वाढवण्यासाठी 8,200 मैलांचा प्रवास करून कतारमध्ये दाखल झाले आहेत.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news