बीसीसीआय : स्थानिक खेळाडूंना मिळणार नुकसान भरपाई, मानधनात देखील वाढ | पुढारी

बीसीसीआय : स्थानिक खेळाडूंना मिळणार नुकसान भरपाई, मानधनात देखील वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) सोमवारी कोरोना प्रादुर्भावामुळे कमी करण्यात आलेल्या 2020-21 सत्रामुळे प्रभावित झालेल्या स्थानिक खेळाडूंना नुकसान भरपाई म्हणून 50 टक्के अतिरिक्त सामन्याच्या मानधनाची घोषणा केली आणि यासोबतच अगामी सत्राकरता देखील मानधन वाढवले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक भारतीय क्रिकेटपटूना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. या खेळाडूंना बीसीसीआयकडून नुकसान भरपाईची बऱ्याच काळापासून प्रतिक्षा होती.

ज्या क्रिकेटपटूनी 2019-20 स्थानिक क्रिकेट सत्रामध्ये सहभाग नोंदवला होता त्यांना 2020-21 सत्रासाठी नुकसान भरपाई म्हणून 50 टक्के अतिरिक्त सामन्याचे मानधन दिले जाईल असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट केले. नुकसान भरपाई देण्यासोबतच सामन्यातील मानधनात वाढ करण्याचा निर्णय हा सोमवारी बीसीसीआयच्या शीर्ष परिषद बैठकीत घेण्यात आला. ज्या रणजी खेळाडूंनी 40 हून अधिक रणजी सामने खेळले आहेत. त्यांचे सामन्यातील मानधन जवळपास दुप्पट म्हणजे प्रतिदिन 60 हजार करण्यात आली आहे.

नव्या मानधन वाढीचा फायदा तब्बल 2000 क्रिकेटपटूंना

याचा अर्थ असा खेळाडू एका सामन्यांतून दोन लाख 40 हजार रुपये कमवू शकतो. ज्या खेळाडूंनी 21 ते 40 दरम्यान सामने खेळले आहेत. त्यांना प्रतिदिन 50 हजार रुपये तर, त्याहून कमी अनुभव असलेल्या क्रिकेटपटूना प्रतिदिन 40 हजार रुपये मिळतील. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा 16 वर्षांखालील ते सिनिअर गटातील जवळपास 2000 क्रिकेटपटूंना मिळणार आहे. यासोबतच 23 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील क्रिकेटपटूना अनुक्रमे 25 हजार आणि 20 हजार रुपये प्रतिदिन मिळणार आहेत.

यापूर्वी रणजी ट्रॉफीच्या अंतिम एकादशमध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला 35 हजार रुपये प्रतिदिन मिळायचे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी देखील बीसीसीआय प्रति सामना 17,500 रुपये द्यायची. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूसाठी देखील घोषणा केली असून वरिष्ठ खेळाडूंना प्रति सामना 12, 500 रूपयांऐवजी 20 हजार रुपये मिळतील. सामन्यातील मानधनाची वाढ एका कार्यसमितीच्या शिफारसीनंतर करण्यात आली. या समितीत माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, युद्धवीर सिंह, संतोष मेनन, जयदेव शाह, अविषेक डालमिया, रोहन जेटली आणि देवजीत सैकिया यांचा सहभाग होता.

Back to top button