शेवटच्या षटकात पंजाबला चार धावांची गरज असताना कार्तिक त्यागीने (1 धाव, 2 विकेटस्) केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर अवघ्या दोन धावांनी थरारक विजय मिळवला. यामुळे पंजाबच्या अर्शदीप सिंग (32 धावांत 5 विकेटस्) व मोहम्मद शमी (21 धावांत 3 विकेटस्) यांची भेदक गोलंदाजी व मयंक अग्रवाल (67), के. एल. राहुल (49), मार्करम (नाबाद 26) यांची फलंदाजी मात्र व्यर्थ ठरली. त्यागीला सामनावीर पुरस्कार मिळाला.
आयपीएलच्या १४ व्या हंगामात आज पंजाब किंग्ज इलेव्हन आणि राजस्थान रॉयल्स ( PBKSvsRR ) यांच्यातील सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन षटकात सलामीवीर यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या एव्हिन लुईसने धडाक्यात फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.
मात्र त्यानंतर लगेचच अर्शदीप सिंगने लुईसला ३६ धावांवर बाद केले. लुईस बाद झाल्यानंतर आलेला कर्णधार संजू सॅमसनही ४ धावा करुन स्वस्तात माघारी परतला. दुसऱ्या बाजूने यशस्वीने दमदार फलंदाजी करत राजस्थानचा धावफलक हलता ठेवला. त्याने लिव्हिंगस्टोनच्या साथीने ११ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले.
लिव्हिंगस्टोनने १७ चेंडूत २५ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र ही खेळी अर्शदीप सिंगने १२ व्या षटकात बाद केले. दरम्यान, यशस्वी जयस्वाल आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र हरदीप ब्रारने त्याला ४९ धावांवर बाद केले. यशस्वी बाद झाला त्यावेळी राजस्थान १३६ धावांपर्यंत पोहचला होता.
त्यानंतर महिपाल लोमरोरने आक्रमक फलंदाजी करत १६ व्या षटकात राजस्थानला १५० च्या पार पोहचवले. त्याने १६ वे षटक टाकणाऱ्या हुड्डाच्या षटकात २ षटकार आणि २ चौकार मारत २४ धावा वसूल केल्या. या षटकातील दमदार फटकेबाजीमुळे लोमरोर अर्धशतकाजवळ पोहचला. मात्र अर्शदीपने त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ दिले नाही. लोमरोर १७ चेंडूत ४३ धावा करुन माघारी फिरला.
लोमरोर बाद झाला त्यावेळी राजस्थानने १७० ही धावसंख्या उभारली होती. डावाची अजून तीन षटके बाकी होती. मात्र धावगती वाढवण्याची जबाबदारी असलेला राहुल तेवातिया २ धावा करुन बाद झाला. तेवातियानंतर आलेला ख्रिस मॉरिस देखील ५ धावांची भर घालून माघारी गेला.
मॉरिस बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव २० षटकात १० बाद १८५ धावांवर आटोपला. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने चांगला मारा करत ३२ धावात पाच विकेट घेतल्या.