Siraj vs Liton Das : लिटनला सिराजशी पंगा घेणं पडलं महागात, पुढच्याच चेंडूवर दांड्या गुल! (Video) | पुढारी

Siraj vs Liton Das : लिटनला सिराजशी पंगा घेणं पडलं महागात, पुढच्याच चेंडूवर दांड्या गुल! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Siraj vs Liton Das : चितगाव कसोटीच्या दुस-या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना लोटांगण घालण्यात भाग पाडले. एकापाठोपाठ विकेट पडत असताना बांगलादेशी फलंदाज लिटन दासने सामन्याच्या एका क्षणी भारतीय गोलंदाज सिराजला डिवचून त्याची लय बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पण या संघर्षात सिराजच उजवा ठरला. त्याने पुढच्याच चेंडूवर लिटन दास क्लिन बोल्ड करून तंबूत पाठवले.

पुजारा, अय्यर आणि अश्विनच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या. यानंतर यजमान बांगलादेश फलंदाजीसाठी उतरला पण त्यांना काही विशेष करता आले नाही. त्यांनी डावाच्या पहिल्याच चेंडूवर नजमल हुसेन शांतोची विकेट गमावली. पंतने विकेटच्या मागे त्याचा झेल टिपला. यानंतर उमेश यादवने यासिर अलीला बोल्ड करून बांगलादेशची अवस्था 5 बाद 2 अशी केली. यानंतर लिटन दासने झाकीर हसनसोबत संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. बांगलादेशच्या डावाचे 14 वे षटक सुरू होणार होते. कॅप्टन राहुलने गोलंदाजीसाठी सिराजच्या हाती चेंडू सोपवला. त्याने षटकाचा पहिला चेंडू 140 किमी प्रतितास वेगाने फेकला. तो लिटनने गलीच्या दिशेने खेळला. त्यावर धाव मिळाली नाही. यानंतर सिराजने लिटनकडे खुन्नस देत त्याची एकाग्रता भंग करण्याच्या उद्देशाने काहीतरी स्लेजिंग केले. यावर लिटन दासने प्रत्युत्तर दिले आणि डाव्या कानाला हात लावून ‘तू काय म्हणातोयस ते मी काही ऐकलं नाही’ असे हावभाव केले. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हा वाद वाढणार असे वाटत असतानाच पंचांना मध्यस्थी करून सिराज-लिटनला शांत केले. त्यानंतर दोघेही आपापल्या जागेवर गेले.

षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सिराजने रनअप घेतला. त्याची नजर लिटनच्या मागे असणा-या तीन विकेट्सवर होती. या दांड्या उडवण्याचे वादळ त्याच्या डोक्यात घोंगवत होते. नॉनस्टायकर एन्डच्या क्रिजकडून त्याने 141 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला. एकाग्रता भंगलेल्या लिटन दासने बचावासाठी बॅट पुढे केली. पण चेंडूने त्याच्या बॅटला चकवा दिला आणि बघता-बघता विकेट्सवर आदळला. याचबरोबर सिराजने फेकलेल्या जाळ्यात लिटन अलगत अडकला आणि क्लिनबोल्ड झाला. त्यानंतर सिराजने ओठांवर बोट ठेवून त्याच्या खास शैलीत सेलिब्रेशन केले. या आनंदोत्सवात त्याला विराट कोहलीची जल्लोषी साथ मिळाली. दुसरीकडे बांगलादेशी लिटन दास झुकलेले खांदे आणि खाली मान करून पॅव्हेलियनमध्ये परतत होता.

Back to top button