Lionel Messi Record : सेमीफायनमध्ये मेस्सीकडून विक्रमांचा पाऊस! | पुढारी

Lionel Messi Record : सेमीफायनमध्ये मेस्सीकडून विक्रमांचा पाऊस!

पुढारी ऑनलाईन डेस्क : लियोनेल मेस्सी फुटबॉल जगतातील असे एक नाव ज्याने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्याने आपल्या खेळीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. फुटब़ॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्येही मेस्सीने आपल्या जादूई खेळीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. (Lionel Messi Record)

क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेस्सीने (Lionel Messi Record) अर्जेंटिनाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. यावेळी त्याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तसेच सामन्यात तिसरा गोल करण्यास असिस्ट केला. या सामन्यात अर्जेंटिनाने क्रोएशियाचा ३-० अशा गोल फरकाने पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाने सहाव्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्यात मेस्सीने एक गोल केला, ज्युलियन अल्वारेझने दोन गोल केले. आता अर्जेंटिना तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १८ डिसेंबरला मोरोक्को आणि फ्रान्स यांच्यातील विजेत्या संघाशी भिडणार आहे.

मेस्सीचा विक्रमी पराक्रम

लिओनेल मेस्सीने क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान असे काही विक्रम केले, की फुटबॉल जगतालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मेस्सी फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. मेस्सीने वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत २५ सामने खेळले आहेत. इतके सामने खेळून त्याने जर्मनीच्या लोथर मॅथ्यूसची बरोबरी केली आहे. फायनलमध्ये मैदानात उतरताच मेस्सी मॅथ्यूसचा विक्रम मोडत विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनेल.

अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

मेस्सी फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. त्याने आपल्या संघासाठी ११ गोल केले आहेत. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात मेस्सीने ६ सामन्यात ५ गोल केले आहेत. त्याचबरोबर मेस्सी विश्वचषकात ५ गोल करणारा वयस्कर खेळाडू ठरला आहे.

मेस्सीने २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण ४ सामनावीरचे विजेतेपद पटकावले आहे. हा देखील एक विक्रमच आहे. याशिवाय मेस्सीने कर्णधार म्हणूनही एक खास विक्रम केला आहे. तो कर्णधार म्हणून फिफा विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. मेस्सीने राफा मार्केझचा विक्रम मोडला आहे.

हेही वाचा

Back to top button