Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा धमाका, रणजी डेब्यूमध्ये ठोकले शतक

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा धमाका, रणजी डेब्यूमध्ये ठोकले शतक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) इतिहास रचला आहे. त्याने रणजी पदार्पणातच गोव्यासाठी शतक झळकावले आहे. अर्जुन सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि चहापानापर्यंत नाबाद 112 धावांपर्यंत मजल मारली. अर्जुनने आपल्या वडिलांप्रमाणे चमत्कार केला आहे. सचिनने 1988 मध्ये रणजी पदार्पणात शतक झळकावले होते. आता तब्बल 34 वर्षांनंतर अर्जुननेही हा पराक्रम केला आहे. 23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने मुंबई संघातून रणजी खेळण्याची संधी न मिळाल्याने यंदा मुंबई सोडून गोव्यासाठी खेळण्याचा निर्णय घेतला होता. अर्जुनने गोवा संघासोबत रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताच आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

गोवा आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याने सुमिरन आमोणकरची विकेट लवकर गमावली. त्याला कमलेश नागरकोटीने बाद केले. दुसरा सलामीवीर अमोघ सुनील देसाई लईत खेळत होता. पण 27 धावांवर असताना त्याला अराफत खानने बाद केले. 59 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर सुयश प्रभुदेसाई आणि स्नेहल सुहास कौटणकर यांनी गोव्याचा डाव सांभाळला.

सुयशसोबत अर्जुनची शानदार फलंदाजी

सुयश आणि स्नेहल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. स्नेहल 104 चेंडूत 59 धावा करून बाद झाली. सिद्धेश लाड 48 चेंडूत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि यष्टीरक्षक एकनाथ केरकरने 15 चेंडूत तीन धावा केल्या. यावेळी संघाची धावसंख्या 81.3 षटकांत 5 बाद 201 होती. यानंतर सुयश प्रभुदेसाईनेच्या जोडीला मैदानात अर्जुन तेंडूलकर उतरला. दोघांनी संयम आणि आक्रमकतेचा मेळ साधत फलंदाजी केली. सामन्याच्या दुस-या दिवसाच्या तिस-या सत्रात अर्जुनने 178 चेंडूत रणजी करियरमधील पहिले शतक पूर्ण केले. दिवसाअखेर सुयश आणि अर्जुन या जोडीने नाबाद राहून 209 धावांची भागिदारी रचली आणि संघाची धावसंख्या 5 बाद 410 पर्यंत पोहचवली. सुयश 172 (357 चेंडू, 25 चौकार) तर अर्जुन 112 (195 चेंडू, 15 चौकार, 2 षटकार) धावांवर खेळत आहे.

वडील सचिनच्या महान विक्रमाची बरोबरी

सचिनने डिसेंबर 1988 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी मुंबईसाठी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गुजरातविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने 100 धावांची खेळी केली होती. यासह सचिन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला होता. सचिनने नंतर दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. आता 34 वर्षांनी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर रणजी प्रदार्पणात शतक झळकावून आपल्या वडिलांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने केलेला हा पराक्रम सोपा नव्हता कारण राजस्थान संघ दोन वेळा रणजी चॅम्पियन आहे. संघात अनिकेत चौधरी, कमलेश नागरकोटी आणि महिपाल लोमरोरसारखे स्टार गोलंदाज आहेत.

अर्जुन हा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. अर्जुनच्या नेत्रदिपक कामगिरीने वडिल सचिन भावूक झाले आहेत. योगराज यांची मेहनत फळाला येत असल्याची भावना मास्टर ब्लास्टरने बोलून दाखवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news