

पुढारी ऑनलाईन डेस्क : Messi Retirement : अर्जेंटिनाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याच्या या घोषनेनंतर चाहत्यांना धक्का बसला असून अनेकांना तर रडू कोसळले. मेस्सी तू निवृत्त होऊ नको, खेळत रहा. तुला मैदानात ड्रिबलिंग करताना पाहत राहणे हा अवर्णणीय अनुभव असतो, असे म्हणत त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.
2022 च्या विश्वचषकादरम्यान मेस्सीने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले असून त्याने अर्जेंटिनाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले आहे. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेस्सीने आपला फॉर्म कायम राखला. त्याने संघाला 3-0 असा विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याला 'सामनावीर' म्हणूनही गौरविण्यात आले. मात्र, या सामन्यानंतर मेस्सीने आपल्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा करून फुटबॉल जगताला हादरा दिला. अर्जेंटिनाने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले आहे. 18 डिसेंबर अंतिम सामना रंगणार असून या ऐतिहासिक सामन्यात मेस्सी अर्जेंटिनाची जर्सी परिधान करून शेवटचा खेळताना दिसणार आहे. या सामन्यात आपल्या संघाला चॅम्पियन बनवून स्पर्धेतील मानाचा गोल्डन बूट आपल्या नावावर करण्याची संधी मेस्सीकडे आहे.
अर्जेंटिना मीडिया आउटलेट 'डायरिओ डेपोर्टिवो ओले'ला दिलेल्या मुलाखतीत मेस्सीने निवृत्तीबाबतची भावना बोलून दाखवली. तो म्हणाला की, विश्वचषक स्पर्धेचा प्रवास अंतिम सामना खेळून संपवणार असल्याचा मला खूप आनंद आहे. पुढच्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत मी खेळू शकेन असे वाटत नाही. त्यामुळे निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते.'
'सौदी अरेबियाविरुद्धचा आमचा पहिला सामना धक्कादायक ठरला. आम्ही सलग 36 सामने जिंकले होते. सौदी अरेबियाकडून आमचा पराभव होईल याची कल्पनाही करू शकत नाही. तो पराभव जिव्हारी लागला. पण त्या सामन्यानंतर आमचा संघ एकवटला. पुढचे सर्व सामने आमच्यासाठी फायनलसारखे होते आणि त्यात सर्व संघ सहका-यांनी जीवतोडून मैदान गाजवले. त्यामुळे, एकप्रकारे सलग पाच अंतिम सामने जिंकल्याचा आम्हाला मोठा आनंद आहे. रविवारच्या अंतिम फेरीतही हाच कल कायम ठेवण्यासाठी अर्जेंटिनाचे खेळाडू प्रयत्नशील असतील,' असेही मनोगत मेस्सीने व्यक्त केले.
क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मेस्सीने पेनल्टीवर 34 व्या मिनिटाला गोल केला. यंदाच्या स्पर्धेतील त्याच्या हा पाचवा गोल होता. त्यानंतर ज्युलियन अल्वारेजने 69 व्या मिनिटाला केलेल्या तिस-या गोलमध्ये असिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्या या जादुई खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने 2014 नंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
कतार विश्वचषक स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये मेस्सीने गोल करण्याबरोबरच सहकारी खेळाडूंनाही गोल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. चालू विश्वचषकात त्याने तीन वेळा (मेक्सिको, नेदरलँड आणि क्रोएशियाविरुद्ध) हा पराक्रम केला आहे. 2022 मध्ये अर्जेंटिनाकडून 22 गोल करण्यात मेस्सीचे योगदान राहिले आहे. यातील 16 गोल त्याने केले आहेत. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत मेस्सीला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. चालू विश्वचषकात सर्वाधिक वेळा त्याची सामनावीर म्हणून निवड झाली आहे.
याचबरोबर मेस्सीने विश्वचषकातील गोल करण्याच्या विक्रमात गॅब्रिएल बटीस्टुटाला मागे टाकले. बटीस्टुटाच्या नावावर 10 गोल असून मेस्सीचे आता 11 गोलपर्यंत मजल मारली आहे. 35 वर्षीय मेस्सी त्याच्या करीयरमधील पाचवा विश्वचषक खेळत आहे. त्याने चार विश्वचषक खेळलेल्या अर्जेंटिनाचे माजी दिग्गज खेळडू दिएगो मॅराडोना आणि जेवियर मास्चेरानोला यांना मागे टाकले आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून जर्मनीने विजेतेपदावर कब्जा केला. यंदा मात्र मेस्सीला आपल्या संघाला चॅम्पियन बनवायचे आहे.
मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने अर्जेंटिनासाठी एकूण 171 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 96 गोल आहेत. जे अर्जेंटिनासाठी सर्वाधिक आहेत. 2014 च्या विश्वचषकात संघाला अंतिम फेरीत नेण्यातही मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या स्पर्धेचा तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता.