France vs Morocco : जाएंट किलर मोरोक्को फ्रान्सची शिकार करण्याच्या तयारीत | पुढारी

France vs Morocco : जाएंट किलर मोरोक्को फ्रान्सची शिकार करण्याच्या तयारीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेच्या दुस-या उपांत्य सामन्यात आज (दि. 14) गतविजेता फ्रान्सचा सामना जायंट किलर ठरलेल्या मोरोक्कोशी आहे. कतारच्या अल बायत स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे. स्थलांतरीत खेळाडूंचा भरणा असलेला आफ्रिकन संघ मोरोक्को पुन्हा एकदा मोठा उलटफेर करून फ्रान्सलाही गुडघे टेकायला भाग पाडणार का? की, अनुभवी दिग्गज खेळाडूंची फौज असणारा फ्रान्स आक्रमक मोरोक्कोला चितपट करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

यंदाच्या विजेतेपदासाठी फेव्हरेट असणा-या फ्रान्सने सलग दुस-यांदा उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी इंग्लंडचा 2-1 पराभव केला. 2018 साली रशियात झालेल्या स्पर्धेचे विजेतेअद पटवून त्यांनी दुस-यांदा ट्रॉफीवर नाव कोरले होते. यंदा त्यांनी पुन्हा एकदा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे, मोरोक्कोने रोनाल्डोच्या पोर्तुगालवर 1-0 ने विजय मिळवून इतिहास रचला. फिफा विश्ववचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. साखळी फेरीपासूनच त्यांनी धक्कादायक निकालांची माळ लावली आहे. साखळी फेरीत बेल्जियम, राउंड ऑफ 16 मध्ये स्पेन आणि उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगाल या बलाढ्य युरोपियन फुटबॉल महासत्तांना त्यांनी नामोहरम केले. आता उपांत्य सामन्यात दोनवेळच्या विश्वविजेत्या फ्रान्सला कडवी झुंज देवून त्यांचीही शिकार करण्यासाठी मोरोक्कन खेळाडू सज्ज झाले आहेत.

मोरक्कन बचाव विरुद्ध फ्रेंच आक्रमण

क्रोएशिया, बेल्जियम, स्पेन आणि पोर्तुगाल हे सर्वच संघ मोरोक्कोची बचावफळी भेदण्यात अयशस्वी ठरले आहेत. मोरोक्कोने संपूर्ण स्पर्धेत फक्त एक गोल स्वीकारला आहे. साखळी फेरीत कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हा गोल झाला होता. पण तो स्वयंगोल ठरला होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाकडून गोल स्वकारण्याची त्यांची पाटी अद्यापही कोरीच आहे. पण दूसरीकडे फ्रेंच आक्रमण डोळे दिपवणारे ठरले आहे. जगप्रसिद्ध फॉरवर्ड एम्बाप्पे, ऑलिव्हर गिराड या दोघांनी फ्रान्ससाठी नऊ गोल डागून संघाच्या प्रत्येक विजयात मोठा वाटा उचलला आहे. तर उस्माने डेंबेले आणि अँटोनी ग्रिझमन यांच्या अचूक पास देण्याच्या कौश्यल्यने प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटतो. त्यामुळे आतापर्यंत गोल न खाणा-या मोरोक्कोचे गोलजाळे फ्रेंचांकडून भेदले जाणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मोरोक्कोला दुखापतीचे ग्रहण

मोरोक्कोने स्पेन आणि पोर्तुगालविरुद्धच्या विजयात मोठी ऊर्जा खर्च केली आहे. काही खेळाडूंना दुखापत झाली, उपांत्य सामन्यातील खेळ त्यांच्या टिकाऊपणाची आणि तग धरण्याची खरी परीक्षा असेल. अशातच सेंटर-बॅक नायफ एग्युर्ड याला पोर्तुगाल विरुद्धच्या सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे बाहेर बसावे लागले होते त्यामुळे तो फ्रान्सविरुद्ध मैदानात उतरणार की नाहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर रोमेन सायस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे चेंडूवर ताबा मिळवून मोरोक्कनच्या डी-पर्यंत धडक मारण्याची फ्रान्सला संधी असणार आहे. अशावेळी मोरोक्कन गोलरक्षक यासीन बौनोवर गोलजाळ्या समोर भिंत म्हणून उभे राहण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. त्याचवेळी फ्रान्सला मोरोक्कोच्या कौंटर ॲटॅकपासून सावध राहावे लागणार आहे.

मोरोक्कोची शैली थेट आहे. उजवीकडून हकीम झियेच आणि डावीकडून सोफियान बौफल प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूंना चकवून स्ट्रायकर युसेफ एन-नेसिरी करवी गोल करण्याचे त्यांची रणनिती असते. पण फ्रेंच ज्युल्स कौंडे आणि थिओ हर्नांडेझ या बचावपटूंचा अडथळा पार करून ते गोल करण्यात यशस्वी ठरतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याउलट, फ्रान्स कोणताही अतिरिक्त वेळ न घेता सामन्याच्या निर्धारीत वेळेतच गोल करून आतापर्यंत विजयी झाला आहे. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासून ते 90 मिनिटांचा खेळ संपेपर्यंत चेंडूवर पूर्ण ताबा ठेवून मोरोक्कोच्या खेळाडूंचा पाळणा करणे हेच फ्रेंचांचे लक्ष्य असेल आणि यात ते सक्षम असतील असे तज्ज्ञांचे मत आहे.

कायलियन एमबाप्पे पाच गोलांसह स्पर्धेतील सर्वोच्च स्कोअरर आहे. डावीकडून होणा-या त्याच्या आक्रमणाला धार असते. तर ऑलिव्हियर गिराड चार गोलांसह दुसरा सर्वोच्च स्कोअरर आहे. सेंटर फॉरवर्ड असणा-या खेळाडूकडे मोक्याच्या क्षणी सामना फिरवण्याची ताकद आहे. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्या हे कौशल्य दाखवून दिले आहे. अशातच फ्रान्सला दुखापतीची चिंता कमी आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे आक्रमण यशस्वी करणारे अनेक खेळाडू आहेत. तर दुसरीकडे मोरोक्कोसाठी अल बायत स्टेडियमधील चाहत्यांची गर्दी उसळेल. याचा त्यांना फायदा मिळेल की नाही हा येणारा काळ ठरवेल.

Back to top button