Brazil FIFA WC : नेमारसह ब्राझीलचे स्वप्न भंगले; क्रोएशिया उपांत्य फेरीत | पुढारी

Brazil FIFA WC : नेमारसह ब्राझीलचे स्वप्न भंगले; क्रोएशिया उपांत्य फेरीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यांच्या फेरीतून पाचवेळचा विश्वविजेता ब्राझील संघाचा क्रोएशियाने पेनल्टी शुटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभव केला. या पराभवमुळे ब्राझील संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. (Brazil FIFA WC)

क्रोएशियाने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचवेळी ब्राझीलचा संघ सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडला. या सामन्यात स्टार खेळाडू नेमारने ब्राझीलसाठी १ गोल केला, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अतिरिक्त वेळेतील खेळ संपल्यानंतर स्कोअर बोर्ड १-१ असा बरोबरीत होता. पेनल्टीवर क्रोएशियाने ४-२ ने विजय मिळवला. (Brazil FIFA WC)

क्रोएशियाने फुटबॉल विश्वचषकात आतापर्यंतचा सर्वात मोठा उलटफेर केला आहे. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ब्राझील संघाचा पराभव केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने हा सामना ४-२ ने जिंकला. तसेच राऊंड ऑफ १६ फेरीतील जपानविरुद्धचा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला होता. २०१८ सालच्या फुटबॉल विश्वचषकामध्ये क्रोएशियाच्या संघाने अंतिम फेरीपूर्वी पेनल्टी शूटआऊटमध्ये बाद फेरीतील ३ सामने जिंकले होते.

सामन्याच्या निर्धारित ९० मिनिटांत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत (९०+३०) खेळवण्यात आला. अतिरिक्त वेळेतील पहिल्या हाफच्या इंज्युरी टाइममध्ये नेमारने गोल नोंदवून मैदानात खळबळ उडवून दिली. त्याने १०५+ १व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० ने आघाडीवर नेले. ब्राझीलचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते.परंतु क्रोएशियाच्या पेटकोविकने ११७व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर हा सामना पेनल्टी शूटआऊट मध्ये गेला.

असा झाला पेनल्टी शुटआऊट

क्रोएशियासाठी पेनल्टी शूटआऊट हा त्यांचा मजबूत पक्ष आहे. तरीही ब्राझीलला पेनल्टी शुटआऊटमध्ये हरवणे क्रोएशियासाठी मोठे आव्हान होते. क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिव्हकोविकने सामन्यात सुमारे १२ ते १३ गोल वाचवले. त्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये रॉड्रिगोचा गोल रोखला. यानंतर ब्राझीलचा अनुभवी बचावपटू मार्किनहोसला चेंडूला गोलपोस्टपर्यंत पोहचवता आले नाही. निकोला व्लासिक, लोवारो मेजर, लुका मॉड्रिक आणि मिसवाल ओरिसिक या तिघांनीही क्रोएशियासाठी गोल नोंदवला. या सामन्याचा हिरो ठरलेल्या डॉमिनिक लिव्हकोविकसोबत क्रोएशियाच्या इतर खेळाडूंनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा;

Back to top button