सांगली : विटा नगरपालिकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन न्यायालयात भूमिका मांडू | पुढारी

सांगली : विटा नगरपालिकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन न्यायालयात भूमिका मांडू

विटा, पुढारी वृत्तसेवा : विटा शहराच्या दोन स्वतंत्र नगरपालिका (पूर्व आणि पश्चिम) करण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी अद्यापही चर्चा झालेली नाही. मात्र, चर्चा करूनच म्हणणे मांडू, अशी भूमिका सरकारी पक्षाच्या वकिलांनी घेतल्याने उच्च न्यायालयात याबाबत शुक्रवारी (दि.९) सुनावणी होऊ शकली नाही.

शुक्रवारी, ९ डिसेंबर रोजी उच्च न्यायाल यात विटा शहराच्या विटा पूर्व आणि विटा पश्चिम या दोन स्वतंत्र गावांकरता दोन स्वतंत्र नगर पालिका व्हाव्यात या रिट पिटीशन याचिकेवर सुनावणी होती. या याचिकेत शहराचा वाढलेला आकार आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन राज्य शासनाने विटा शहराचे दोन स्वतंत्र गावे करण्यास मंजुरी दिली आहे. तशीच या दोन गावांचा स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी दोन स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था (अर्थात दोन स्वतंत्र नगरपालिका) केल्या पाहिजेत अशी मागणी केलेली आहे. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

गेल्या सुनावणी दरम्यान, नगर विकास मंत्रालयाचे मंत्री, संबंधित सचिव तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विटा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीसा पाठविल्या होत्या. त्या नोटिसीमध्ये विटा शहराच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत नऊ डिसेंबर पूर्वी सर्वांनी हजर राहून लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आज हे प्रकरण न्यायालयासमोर आले, तेव्हा सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकील सी. डी. मॉल यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला. यावेळी सरकारी वकीलांनी मुख्यमंत्री आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच पुढच्या तारखेला म्हणणे माडू असे न्यायालयात सांगितले. याचिकाकर्ते राहुल शितोळे यांच्यावतीने अॅड लक्ष्मण कालेल यांनी त्यास दुजोरा दिला त्यामुळे आता पुढच्या तारखेला काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button